नवी दिल्ली : तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाने (BoB) कार कंपन्यांच्या कारच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर कार कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. याचा थेट फायदा तुमच्या खिशाला होणार आहे. बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.
बँकेने व्याजदर 7 टक्के केला आहे. एकीकडे वेगवेगळ्या बँका कर्जावरील व्याजात वाढ करत आहेत, तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदाने व्याजात कपात करून मोठा दिलासा दिला आहे. सध्या बँक कार कर्जावर 7.25 टक्के वार्षिक व्याज आकारत होती. व्याजदरात कपातीसोबतच कर्जाची प्रक्रिया शुल्कही (Processing Fee) कमी करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
या ऑफर अंतर्गत, बँक प्रक्रिया शुल्क म्हणून ग्राहकांकडून 1,500 रुपये + GST आकारेल. ही ऑफर 30 जून 2022 पर्यंत वैध असेल. नवीन कार खरेदी केल्यावरच हा फायदा मिळेल. व्याजदर ग्राहकाच्या 'क्रेडिट प्रोफाइल'शी जोडला जाईल.
बँकेचे महाव्यवस्थापक एचटी सोलंकी म्हणाले, "कार कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे वाहन खरेदी करणे आता अधिक परवडणारे असेल." मात्र, सेकंड हँड कार आणि दुचाकींच्या कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर 6.75 वरून 6.50 टक्क्यांवर आणला.
किती होईल फायदा?
जर तुम्ही कार घेण्यासाठी 7 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेण्याची योजना आखत असाल, तर 7.25 टक्के दराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15,215 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. आता जर तुम्हाला तेच कर्ज 7 टक्के वार्षिक दराने मिळत असेल तर तुम्हाला दरमहा 15,093 रुपये ईएमआय भरावे लागेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला 122 रुपये कमी द्यावे लागतील. एका वर्षात ते 1464 रुपये होते.