Join us

Gautam Adani Group: १३२ अब्ज डॉलर्स अदानींनी गमावले, तरी आणखी कर्ज देण्याची तयारी करतेय ही सरकारी बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 6:38 PM

२४ जानेवारीला अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा रिपोर्ट आला होता. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अदानी आता श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

हिंडनबर्गच्या एका रिपोर्टने अदानींच्या साम्राज्याची पार हवाच काढून टाकली आहे. अदानींनी या महिनाभरात थोडे थोडके नव्हे तर १३२ अब्ज डॉलर्स गमावले आहेत. अदिनींच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी तर गुंतवणुकीच्या ७० टक्के पैसे गमावले आहेत. एकेक दिग्गज कंपन्या अदानींची साथ सोडून जात आहेत. असे असताना एक सरकारी कंपनी अदानींचा पाय खोलात असतानाही कर्ज देण्याची तयारी करत आहे. 

२४ जानेवारीला अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा रिपोर्ट आला होता. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अदानी आता श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. अदानी ग्रुपमध्ये अनेक कंपन्यांचे, बँकांचे पैसे बुडाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अनेक गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झालेले असताना बँक ऑफ बडोदा या ग्रुपला अतिरिक्त कर्ज देण्याची तयारी करत आहे. 

जर अदानी ग्रुपने बँकेच्या अंडररायटिंग मानकांची पूर्तता करत असेल तर त्यांना अतिरिक्त कर्ज देण्यास कोणतीही अडचण नाही, असे बँक ऑफ बडोदाचे म्हणणे आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार बँकेचे सीईओ आणि एमडी संजीव चढ्ढा यांनी ही माहिती दिली आहे.

चड्ढा म्हणाले की, अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीची आपल्याला अजिबात चिंता नाही. बँकेच्या अंडररायटिंग मानकांची पूर्तता केल्यास बँक गटाला अतिरिक्त कर्ज देण्यास तयार आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील प्रकल्पासाठी बँक अदानी समूहाला कर्जही देऊ शकते. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बँक अदानी समूहाला कर्ज देण्याचा विचार करेल, असे ते म्हणाले. 

चड्ढा यांनी अदानी समूहावर बँकेचे कर्ज किती आहे हे सांगण्यास नकार दिला. याआधी त्यांनी आरबीआयच्या फ्रेमवर्कच्या मर्यादेच्या एक चतुर्थांश असल्याचे म्हटले होते. त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठी बँक SBI (SBI) चे अदानी समूहावर सुमारे 270 अब्ज रुपयांचे कर्ज आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ५०.७ अब्ज रुपयांच्या बोलीने हा प्रकल्प जिंकला होता.

टॅग्स :अदानी