बचत करणं हा मध्यमवर्गीय मराठी माणसाचा स्वभाव आहे. महागाई वाढली, तरी खर्च कमी करून छोटी-छोटी रक्कम घरोघरीच्या 'होम मिनिस्टर' बाजूला काढत असतातच. ही बचत योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्याचा चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी बँकांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण ते ऐकून बऱ्याच जणांचा गोंधळ होतो, मनात चलबिचल होते. 'फिक्स'ला टाकू, रिकरिंग उघडू, पीपीएफमध्ये गुंतवू की म्युच्युअल फंड सही है?, असे प्रश्न निर्माण होतात. त्याचं उत्तर शोधण्यासाठी काही टिप्स आपण पाहूया...
>> आपल्याला कोणत्या उद्देशाने पैसे गुंतवायचे आहेत आणि किती जोखीम पत्करायची तयारी आहे, हे आधी नक्की करा.
>> आपली मुद्दल कायम राहावी, तिला धक्का लागू नये असं वाटत असेल आणि परताव्याची हमी हवी असेल, तर रिकरिंग डिपॉझिट किंवा पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचा (पीपीएफ) पर्याय अचूक आहे.
>> अधेमधे काही खर्च उद्भवण्याची शक्यता असेल आणि तेव्हा पैसे काढावे लागणार असतील तर रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडावा.
>> पीपीएफमध्ये आपली रक्कम १५ वर्षांसाठी 'लॉक' होते. निवृत्तीनंतरची तरतूद म्हणून हा पर्याय उत्तम आहे. परंतु, मधल्या काळात गरज लागल्यास तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी वेगळी तरतूद शक्य असेल तर पीपीएफमध्ये अगदी डोळे झाकून पैसे गुंतवायला हरकत नाही. पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजाइतकं व्याज सध्या तरी अन्य कुठल्याच गुंतवणुकीवर मिळत नाही.
>> आपलं उत्पन्न, खर्च, आत्तापर्यंतची बचत याचा एक ताळेबंद बांधल्यानंतर, थोडी जोखीम पत्करणं झेपणार असेल तर म्युच्युअल फंडात एसआयपी- अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करावा.
>> हायब्रिड म्युच्युअल फंड आपल्या एकूण रकमेतील ६५ टक्के रक्कम शेअर बाजारात आणि ३५ टक्के रक्कम बॉण्ड्समध्ये गुंतवतात. साधारण पाच वर्षांनंतर आपल्याला दहा टक्क्यांहून जास्त परतावा मिळू शकतो. परंतु, चांगल्या फंडाची निवड केली नसेल आणि शेअर बाजार गडगडला तर फटकाही बसू शकतो. त्यामुळे फंडाची दहा वर्षांतील कामगिरी तपासून किंवा तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ही निवड करणं फायद्याचं ठरेल.
पीपीएफ, एनएससीचे व्याजदर कमी होणार
पैसा वाढेल, कर वाचेल; 'या' खात्यात पैसे गुंतवून निश्चिंत व्हा!