- राकेश घानोडे
नागपूर : ग्राहकाची कोणतीही चूक नसताना त्याच्या बँक खात्यातून चोरी गेलेली रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधित बँकेची असते. अशा प्रकरणातील पीडित ग्राहकाला कायदेशीर भरपाई अदा करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला.
सीआरपीएफमधील भास्कर भोजेकर हे नागपुरात असताना त्यांच्या नाशिक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातील ४० हजार रुपये मुंबईतील भिवंडी येथील एटीएममधून चोरण्यात आले. त्यानंतर बँकेने भरपाईचा दावा अमान्य केल्यामुळे, त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती.
मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी ती तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. अज्ञात व्यक्तीने यंत्रणेतील त्रुटीचा फायदा घेऊन बँक खात्यातील रक्कम चोरल्यास त्यासाठी बँक जबाबदार असते. या प्रकरणात असेच घडले. त्यात ग्राहक भोजेकर यांचा काहीच दोष नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार स्टेट बँक आॅफ इंडियाने त्यांची रक्कम १० दिवसात परत करणे, प्रकरणाची सखोल चौकशी करणे व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, बँकेने तसे केले नाही, असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आणि भोजेकर यांना त्यांचे ४० हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे, असे आदेश बँकेला दिले.
व्याज ११ डिसेंबर २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, भोजेकर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रार खर्चापोटी ५
हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.
बँकेचा बचाव अमान्य
बँकेने भोजेकर यांच्या तक्रारीवर उत्तर सादर करून स्वत:च्या बचावाकरिता विविध मुद्दे मांडले होते. या चोरीसाठी भोजेकर स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी गोपनीय माहितीच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन झाले. ही तक्रार खोटी व गुणवत्ताहीन आहे. या तक्रारीवर मंचमध्ये कार्यवाही केली जाऊ शकत नाही. यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करायला पाहिजे, असे बँकेचे म्हणणे होते. परंतु, संबंधित मुद्दे मंचला प्रभावित करू शकले नाहीत. मंचने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता, भोजेकर यांना दिलासा देणारा निर्णय जारी केला.
बँक खात्यातून चोरी गेलेली रक्कम परत करण्याची जबाबदारी बँकेची
सीआरपीएफमधील भास्कर भोजेकर हे नागपुरात असताना त्यांच्या नाशिक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातील ४० हजार रुपये मुंबईतील भिवंडी येथील एटीएममधून चोरण्यात आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 04:22 AM2019-12-06T04:22:58+5:302019-12-06T04:25:04+5:30