नवी दिल्ली - बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या आठवड्यात बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. मात्र या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहणार आहे. बँक संपामुळे (Bank Strike) दोन दिवस बंद राहणार आहे. बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाविरोधात (Bank Privatization) बँक संघटनांनी (Bank Unions) या आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. दोन दिवसीय संपामुळे आठवड्यात 16 डिसेंबर (गुरुवार) आणि 17 डिसेंबरला (शुक्रवार) बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.
19 डिसेंबरला रविवारच्या सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. अशा प्रकारे या आठवड्यात देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत. तसेच बँकांच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्ट्याही (Regional Holiday) दिल्या जातात. या आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 डिसेंबरला यू सो सो थाम यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे मेघालयातील (Meghalaya) बँकांचे कामकाज शनिवारी बंद राहणार आहे. त्यामुळेच देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत, मात्र स्थानिक सुट्ट्यांमुळे मेघालयातील बँका चार दिवस बंद राहणार आहेत.
लवकर उरकून घ्या महत्त्वाची कामं
आठवड्याचे पहिले तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी बँका सामान्य कामकाज करतील. अशा परिस्थितीत आठवड्याच्या सुरुवातीला बँकिंगशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे पटकन उरकून घ्या. अन्यथा नाहक त्रास होऊ शकतो. तसेच या आठवड्यात महिन्याचा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे मेघालय वगळता देशाच्या इतर सर्व भागात शनिवारी बँका सुरू राहणार आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही.
असे करा व्यवहार
सर्व बँकांच्या डिजिटल बँकिंग सेवा (Digital Banking), इंटरनेट बँकिंग (Internet Banking), यूपीआय आधारित सेवा (UPI), मोबाईल बँकिंग (Mobile Banking) इत्यादी सामान्य पद्धतीने कार्य करतील. तसेच, संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आठवडाभरात एटीएममधून (ATM) पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकांनी बंदोबस्त सुरू केला आहे. यासाठी एटीएममध्ये रोखीची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.