मार्च एंडिंगची कामे खोळंबलेली असताना अचानक बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारल्याने खळबळ उडाली आहे. अशावेळी आजपासून शुक्रवारपर्यंत तुमच्या हातात तीनच दिवस उरले आहेत. यामुळे एसबीआयने ग्राहकांना या दोन दिवसीय संपासाठी अलर्ट केले आहे.
विविध कर्मचारी संघटनांनी २८ आणि २९ मार्चला दोन दिवसीय संप पुकारला आहे. आज २३ मार्च असून शुक्रवारी २५ मार्चपर्यंतच कामकाज सुरु राहणार आहे. यानंतर चौथा शनिवार असल्याने २६ मार्चला आणि २७ मार्चला साप्ताहिक सुटी असणार आहे. यानंतर सोमवारी २८ आणि मंगळवारी २९ मार्चला संप पुकारल्यामुळे बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे.
एसबीआयने यासाठी शेअर मार्केटलाही कळवले आहे. 'बँकेने संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे, परंतु संपामुळे बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची भीती आहे. ', असे एसबीआयने म्हटले आहे.
तुम्हालाही कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल किंवा SBI च्या शाखेत जायचे असेल तर 28-29 तारखेला जाऊ नका किंवा पहिल्या शाखेतून माहिती घ्यावी लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नुसार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने माहिती दिली आहे की ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यांनी नोटीस जारी केली आहे. त्यांना देशभरात संपावर जाण्याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण आणि बँक कायदा दुरुस्ती विधेयक 2021 विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.