मुंबई : थकीत कर्जासाठी जास्त तरतूद करावी लागल्यामुळे अनेक सरकारी बँकांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचा (एसबीआय) शुद्ध नफा ६७ टक्क्यांनी घटून १२५९.४९ कोटी रुपये झाला. ३१ डिसेंबर २०१५ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीची आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली, त्यात ही बाब स्पष्ट झाली.स्टेट बँकेने २०१४-१५ च्या वित्तीय वर्षात याच तिमाहीत ३८२८.२० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. एकत्रित आधारावर याच तिमाहीत स्टेट बँकेचा निव्वळ नफा ६१.६ टक्क्यांनी घटून १,११५.३४ कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हा नफा २,९१०.०६ कोटी रुपये होता. मात्र याच तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ४६,७३१ कोटी रुपये झाले. यापूर्वीच्या वित्तीय वर्षात ४३,७८४ कोटी उत्पन्न झाले होते.या तिमाहीत बँकेने थकीत कर्जासाठी ७,६४४.५२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापूर्वीच्या वर्षात ही रक्कम ५,३२७.५१ कोटी रुपये होती. सार्वजनिक क्षेत्रातील या प्रमुख बँकेने म्हटले आहे की, थकीत कर्जासाठी आवश्यक पावलांचा विचार केल्यानंतरच हे वित्तीय परिणाम झाले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत बँकेचे एकूण थकीत कर्ज ७२,७९१.७३ कोटी रुपये राहिले. तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत बँकेचे एकूण थकीत कर्ज ५.१० टक्के राहिले. वर्षभरापूर्वी याच अवधीत ते ४.९० टक्के होते. याच प्रकारे निव्वळ थकीत कर्ज २.८९ टक्के राहिले. गेल्यावर्षी याच अवधीत ते २.८० टक्के होते.युनियन बँकसार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक आॅफ इंडियाचा नफाही ७४ टक्क्यांनी घटून ७८.५ कोटी रुपये झाला. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. त्यात ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ३०२.४२ कोटी रुपये नफा झाला होता.
थकीत कर्जामुळे बँकांचा नफा घटला
By admin | Published: February 12, 2016 3:48 AM