देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. त्याचं कारण म्हणजे आज बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीबाबत मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बँक कर्मचाऱ्यांना रविवारी आणि महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. मात्र आता बँक कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळू लागणार नाही. रिपोर्ट्सनुसार युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज आणि इंडियन बँक्स असोशिएशनने दोन दिवसांच्या आठवडी सुट्टीसाठी आपली मान्यता दिली आहे.
बँक कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने त्यांना महिन्यातील सर्व शनिवारी सुट्टी देता येईल का? याबाबतची तयारी सुरू आहे. यासंदर्भात एक मोठी बैठक होणार आहे. तसेच हा बदल झाल्यानंतर बँकांमधील कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीसुद्धा सुट्टी मिळणार आहे. याचा अर्थ आता बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवसच काम करावं लागेल. तसेच दर शनिवार आणि रविवारी सुट्टी मिळेल. आयबीए या मुद्द्यावर सहमत आहे. तसेच आज २८ जुलै रोजी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजने याच महिन्यात सांगितलं होतं की, पुढच्या बैठकीमध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीबाबत चर्चा करण्यात येईल. ही बैठक आज होण्याची शक्यता आहे. आयबीएकडून बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत सक्रियपणे विचार केला जात असल्याचे आणि नवी व्यवस्था लागू करण्यासाठी आता आणखी उशीर न करण्याबाबतचे संकेत आधीच देण्यात आले होते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा व्हायचा आहे.
तसेच दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर बँकांमध्ये ५ दिवसांच्या आठवड्याची व्यवस्था लागू झाली तर बँक कर्मचाऱ्यांना दररोज ४० मिनिट अतिरिक्त काम करावं लागू शकतो. म्हणजेच त्यांच्या कामाची वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत काम करावं लागू शकतं.