Join us  

शेअर बाजार निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय; 'या' क्षेत्रातील गुंतवणूक ठरू शकेल फायद्याची!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 8:41 AM

बँकिंग क्षेत्रात  एनपीएस म्हणजेच बुडीत कर्ज ही एक प्रचंड डोकेदुखी असते. यातच पूर्वीच्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे मोठ्या प्रमाणात बुडीत झाली आहेत.

सध्या शेअर बाजार एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. निफ्टीची १७५०० ते १७६००, तर बँक निफ्टीची ३८६०० ही पातळी रेझिस्टन्स लेव्हल आहे. यावर जर बाजार काही काळ स्थिर राहिला, तर वरची पातळी गाठण्यासाठी सज्ज होईल. अन्यथा एक करेक्शन येऊ शकते, जे बाजार थोडा हलका करेल. बाजाराच्या या वळणावर बँकिंग आणि आयटी या क्षेत्रांतील शेअर्स येणाऱ्या काळात उत्तम वाढू शकतात.

बँकिंगमधील कोणते शेअर्स घ्यावेत?

पब्लिक सेक्टर बँकिंगमधील शेअर्स या निमित्ताने निवडता येतील. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक, आदी बँकिंग शेअर्सवर लक्ष ठेवावे.

पब्लिक सेक्टर बँकिंग का?

बँकिंग क्षेत्रात  एनपीएस म्हणजेच बुडीत कर्ज ही एक प्रचंड डोकेदुखी असते. यातच पूर्वीच्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे मोठ्या प्रमाणात बुडीत झाली आहेत. केंद्र आणि रिझर्व्ह बँकेचे धोरण यावर अधिक कडक अवलंबिले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काही वर्षांत दिसून येईल. बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होईल याची शक्यता अधिक आहे. याचा परिणाम बँकांचा नफा वाढण्यावर होईल. तसेच महागाई विरोधात रिझर्व्ह बँकेचे व्याजदर वाढीचे धोरण बँकांच्या नफ्यात अजून वाढ करू शकते. परिणामी भविष्यात पब्लिक सेक्टर बँकांच्या शेअर्सला मागणी वाढू शकते. यामुळे वर्तमानात केलेली गुंतवणूक भविष्यात वाढू शकते.

आयटी क्षेत्र :

आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये जागतिक पातळीवरच एक मोठे करेक्शन आले होते. यातून हे क्षेत्र आता पुन्हा जोम धरू लागले आहे.निफ्टी आयटी इंडेक्स ३९४४७ या त्याच्या उच्चतम पातळीवरून गेल्या वर्षभरात २६१८० या नीचांकी पातळीवर खाली येऊन आता ३०००० या पातळीवर आहे. नफ्यातील मार्जिन घसरणे, जास्त प्रमाणातील ऍट्रिशन रेट (मनुष्यबळ सोडून जाणे) यामुळे आयटी क्षेत्रावर दबाव होता. तो येणाऱ्या काळात कमी कमी होऊ शकतो. यामुळे या क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील.

कोणते शेअर्स निवडाल?

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपण निवडू शकता.  उदा. टीसीएस, एल अँड टी इन्फोटेक, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्विसेस, माईंड ट्री, इन्फाेसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो अशा कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.अनेक सेक्टर्समधून भविष्यात कोणते सेक्टर्स चांगला परफॉर्मन्स करू शकतील याचा अभ्यास करून त्यामध्ये गुंतवणूक करणे यातच खरी बाजार नीती आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय