नवी दिल्ली- जर तुम्ही मॅग्नेटिक स्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. 31 डिसेंबर 2018च्या पूर्वीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मेगास्ट्राइप कार्ड बदलून घ्यावं लागणार आहे. अन्यथा आपलं कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. सर्व मेगास्ट्राइप कार्ड 31 डिसेंबर 2018नंतर निष्क्रिय होणार आहेत. त्यामुळे आपल्याला या कार्डांच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत.
डेबिट आणि क्रेडिट कार्डांद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच मेगास्ट्राइप कार्ड बंद करण्यात आली आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार, मेगास्ट्राइप कार्डाची वर्ष 2018मध्ये ईएमवी चिप बदलावी लागणार आहे. कारण मेगास्ट्राइप कार्डची वैधता 31 डिसेंबर 2018पर्यंतच आहे. मेगास्ट्राइप कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग सारख्या फसवणुकीचं कारण ठरत आहे. ईएमव्ही चिप बेस्ड कार्डद्वारे हे फसवणुकीचे प्रकार रोखता येऊ शकतात. आपल्याला जुनं कार्ड बदलण्यासाठी बँकेकडून मेसेजही आले आहेत. विशेष म्हणजे हे कार्ड बदलून घेण्यावर कोणतंही शुल्क आकारलं जातं नाही.
- का बंद होत आहेत जुनी एटीएम कार्ड
जुन्या एटीएम डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या मागे काळी पट्टी आहे. ही काळी पट्टी मॅग्नेटिक स्ट्रिप आहे. ज्यात आपल्या खात्याची संपूर्ण माहिती दडलेली असते. आरबीआयच्या माहितीनुसार मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड आता जुनं तंत्रज्ञान झालं असून, ते तयार करणंही बंद करण्यात आलं आहे. हे कार्ड पूर्णतः सुरक्षित नाही. या कारणास्तव ती कार्ड बंद करण्यात आली आहेत.
- कसं समजेल आपलं डेबिट कार्ड मॅग्नेस्ट्रिप कार्ड आहे- आपल्याला जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मॅग्नेस्ट्रिप आहे की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास ते एटीएम कार्ड नीट पाहावे. जर त्या एटीएमवर कोणतीही चिप नसेल तर ते मॅग्नेस्ट्रिप कार्ड समजावे.