नवी दिल्ली - जर तुम्ही १९ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी बँकेसंबंधित काही महत्त्वाच्या कामाचं नियोजन करत असाल तर ती कामे आधीच आटोपून घ्या. कारण या दिवशी देशभरातील बँकिंग सेवा प्रभावित राहण्याची शक्यता आहे. १९ नोव्हेंबर रोजी देशभरातील बँकांमध्ये संप होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने १९ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय संपाचं आवाहन केलं आहे.
या संपामुळे एटीएमसह सर्व बँकिंग सेवा या दिवशी प्रभावित राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने शेअर बाजारांना पाठवलेल्या सूचनेमध्ये सांगितले की, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या महासचिवांनी भारतीय बँक संघटनेला संपाची नोटिस दिली आहे. या नोटिशीमध्ये सांगितले की, एआयबीईएच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनामध्ये १९ नोव्हेंबर रोजी संपाची हाक दिली आहे.
दरम्यान, बँकेने सांगितले की, संपाच्या दिवशी बँकेची ब्रँच आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत. मात्र संप जर झाला तर त्या दिवशी बँकिंगच्या सेवा प्रभावित होऊ शकतात.