नवी दिल्ली - बँक कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय देशव्यापी संप, साप्ताहिक सुटी आणि दिवाळीच्या सुट्ट्यामुळे आठवडाभरात पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्यांचे हाल होणार आहेत. दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण आणि व्याजदर कमी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बँकांच्या विविध संघटनांनी कामबंद आंदोलन केले.
२१ ते २९ ऑक्टोबर या कालावधी चार दिवस बँका सुरू राहणार आहेत. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार (२३, २४, २५ ऑक्टोबर) हे तीन दिवस बँकांचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर २६ ते २९ ऑक्टोबरपर्यंत बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस बँकांमध्ये नागरिकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी ग्राहकांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज रखडल्याचे चित्र होते.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ठराविक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याचे स्टेट बँकेकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि सिंडीकेट बँक या बँकांनी सेवा विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. नऊपैकी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए) आणि भारतीय बँक कर्मचारी महासंघ (बीईएफआय) या दोन कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारले होते.
आंध्र बँक, अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, सिंडीकेट बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये केली होती. त्याला दोन बँक कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपानंतरही काही बँका सुरू करण्यात आल्या. मात्र, कर्मचारी नसल्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.
२० ऑक्टोबर- बँक बंद
२२ ऑक्टोबर- बँक बंद
२३ ते २५ ऑक्टोबर- बँक सुरू
२६ ते २८ ऑक्टोबर- बँक बंद
एटीएम कॅशलेस
पाच दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममधील रोकड संपण्याची शक्यता आहे. त्याचाही नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दिवाळीत शनिवार, रविवार असे दोन सुटीचे दिवस आल्यामुळे बँका अधिक काळ बंद राहणार आहेत.