वॉशिंग्टन : भारतातील बँकिंग क्षेत्र मजबूत आहे आणि पीएनबी घोटाळ्यातील रक्कम देशातील बँकिंग क्षेत्राच्या फक्त तीन दिवसांच्या व्याजाच्या कमाईएवढी आहे, असे मत मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) सीईओ आशिष चौहान यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कर्ज घोटाळ्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र संकटात सापडल्याच्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) विद्यार्थ्यांसमोरील भाषणात चौहान म्हणाले की, भारतीय बँकिंग क्षेत्र मजबूत आहे. मात्र, १९९२ च्या हर्षद मेहताच्या घोटाळ्यानंतर भारतीय बँकिंग व्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेने योग्य पावले उचलली असती तर, घोटाळे झाले नसते, हेही त्यांनी स्पष्ट केले. आमचे डोळे आता उघडले आहेत आणि आम्ही आता चांगल्या प्रकारे काम करत आहोत. नोटाबंदी आणि जीएसटी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे अनेक सुधारणा होत आहेत, असेही ते म्हणाले.कर्ज बुडणे हे गृहीतचधरलेले असतेचौहान म्हणाले की, भारतीय बँका कर्ज घेणाऱ्याकडून १२ टक्क्यांनी व्याज घेतात. तर, जे लोक बँकांकडे पैसे जमा करतात त्यांना ४ टक्क्यांनी व्याज दिले जाते. म्हणजेच, आमच्या बँका ८ टक्के नफा मिळवितात. वर्षभरात १२ टक्के व्याजाने १२ लाख कोटी मिळतात. म्हणजचे एका महिन्यात एक लाख कोटी रुपये मिळतात. तीन दिवसांत १० हजार कोटी मिळवितात. पीएनबी घोटाळा किती रुपयांचा आहे? हा तीन दिवसांच्या व्याजाएवढाच आहे. बँकांमध्ये असे प्रकार होत असतात. या व्यावसायिक बाबी आहेत. बँका जेव्हा ८ टक्के नफा घेत असताना त्यांनी हे गृहीत धरलेले असते की, १२ पैकी १ व्यक्ती कर्जची फेड करणार नाही. तरीही बँकांची स्थिती चांगली राहील. कारण, कर्जदारांकडून मूळ रक्कम परत मिळणार आहे.
घोटाळ्यामुळे बँकिंग क्षेत्र संकटात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:41 AM