मुंबई - बँकेत पैसे ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुमचेही बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे. रिझर्व्ह बँक लवकरच एक बँक बंद करणार आहे. आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता २२ सप्टेंबरपासून ही बँक बंद होणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून बँकांसाठी अनेक प्रकारचे आदेश जारी केले जातात, त्याचं पालन करणं अनिवार्य असतं. तसेच आरबीआय बँकांसाठी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी करत असते. या सूचनांचं पालन न करणाऱ्या वित्तीय संस्थांचा परवाना रद्द करण्यात येतो. त्यानुसार पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
आरबीआयच्या या निर्णयानंतर येत्या २२ सप्टेंबरपासून ही बँक बंद होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबर रोजी ही बँक आपले कामकाज बंद करेल. त्यानंतर ग्राहक या बँकेत पैसे जमा करू शकणार नाहीत, तसेच बँकेतून पैसे काढू शकणार नाही. तसेच कुठलाही व्यवहार करू शणार नाहीत. आरबीआयने सांगितले की, या बँकेकडे पुरेसा निधी आणि पुढे कमाई करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे. दरम्यान, बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना बुडीत ठेवींच्या प्रमाणात ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.