देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कोटक यांनी अचानक राजीनामा दिल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोटक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी आपण स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी म्हणून काम पाहत असलेल्या उदय कोटक यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होता. मात्र कोटक यांनी हा कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या प्रमुखांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच राजीनामा देण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही सांगितले आहे.
उदय कोटक यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक असलेले दीपक गुप्ता हे तात्पुरते सीईओ म्हणून काम पाहतील.