Join us

बँका कोसळताहेत...मंदी येऊ घातली की काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 10:21 AM

एकामागोमाग एक बँकांचे दिवाळे निघत आहे. कर्ज देणारे हात खायीत अडकले आहेत. नेमके त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? बँकिंगमधील आरिष्ट का येऊ घातले? का कोसळताहेत बँका? मंदी येऊ घातली आहे की काय?

-  देवीदास तुळजापूरकर (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक)

अमेरिकेतील सिल्वरगेट, सिलिकॉन व्हॅली, सिग्नेचर बँक, एकानंतर एक बँका कोसळल्या आहेत. एकदा अमेरिकन बँकिंग क्षेत्र म्हणजेच पर्यायाने अमेरिकन अर्थव्यवस्था संकटात सापडते की काय? हे अरिष्ट जागतिक आर्थिक संकटात परावर्तित होते काय? या शंकेने जगाला ग्रासले आहे. याचा परिणाम जगभरातील वायदे बाजारात उमटलेला दिसतो. आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर जगभरातील बँकर्स शोधत आहेत.

भारतातही पहिल्या टप्प्यात मोठ्या उद्योगांना वाटलेल्या कर्जामुळे जो पेचप्रसंग निर्माण झाला होता तो आता छोटा व्यापार- उदीम, घरबांधणी, वाहन इत्यादी क्षेत्रांना बँका ज्या आक्रमकपणे कर्ज वाटत आहेत, ते लक्षात घेता त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी साधार भीती वाटत आहे. रिझर्व बँकेने सर्व बँकांना तसा इशाराही दिलेला आहे. धोरणांच्या ज्या चौकटीत या बँका आज काम करत आहेत त्या चौकटीत ही जोखीम अंतर्भूत आहे, धोकाही अटळ आहे. यावर सरकारने आधी आपले धोरण निश्चित करायला हवे, अन्यथा बँकिंगची ही फरफट अशीच चालू राहील. अमेरिकेत जे घडले, ते कालांतराने भारतातही होऊ शकेल. 

२००८ च्या वैश्विक वित्तीय संकटाला निकृष्ट दर्जाची गृहबांधणी कर्ज, बँकर्स आणि पतमानांकन संस्थांचा खोटेपणा असे अनेक घटक जबाबदार होते. याचा अर्थ तो एक महाघोटाळा होता म्हणा ना! कर्जदारांकडून परतफेड शक्य नव्हती यातून या संकटाची सुरुवात झाली होती; पण आता ज्या संकटातून बँकिंग वाटचाल करत आहे, त्यात ही शक्यताच नाही. कारण यात बाँड्सचा अंतर्भाव आहे. 

ज्याचे पैसे परत मिळणे हे आश्वस्त आहे. आत्ताचा पेचप्रसंग सेंट्रल बँकिंग ऑथॉरिटी, माॅनेटरी ॲथाॅरेटी या भूमिकेतून जी धोरणे फेडरल रिझर्व बँकेने राबविली त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गोष्ट टळू शकली नसती काय? होय, नक्कीच... पण त्यासाठी फेडरल रिझर्व बँकेतर्फे इन्स्पेक्शनचा एक भाग म्हणून जी स्ट्रेस टेस्ट केली जाते त्यात चढत्या व्याजदरामुळे गुंतवणुकीत सिलिकॉन व्हॅली किंवा इतर बँकांना जो संचित तोटा झाला होता तो वेळीच लक्षात आला असता. 

त्यातून वेळीच हे अरिष्ट पृष्ठभागावर आले असते; पण सरकारने २०१८ साली दुरुस्ती करून अडीचशे अब्ज डॉलरपर्यंत भांडवल असणाऱ्या बँकांना यातून सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या बँका यातून वगळल्या गेल्या होत्या. वित्तीय क्षेत्र नेहमीच निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने ठाम उभे राहिलेले आहे. त्यांना वश करण्यासाठी रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय होता. ज्यामुळे सिलिकॉन व्हॅली आणि इतर बँका अडचणीत आल्या आहेत.

आता परिणामी अमेरिकेतील वित्तीय क्षेत्राच्या मानांकनाने स्थिरतेवरून उलट्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली आहे. बँका कोसळत राहतील असे भाकीत अमेरिकेतील वित्तीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत आणि असे झाले तर सुरुवातीला अमेरिकन बँकिंग आणि मग जगातले बँकिंग पुन्हा एकदा संकटात जाऊ शकते.

टॅग्स :बँक