लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने सणासुदीच्या काळासाठी आपले कर्ज स्वस्त केले आहे.
बँक ऑफ बडोदाने गृहकर्ज आणि कार कर्ज यांच्या व्याजात सूट जाहीर केली आहे. सध्याच्या व्याजदरावर ०.२५ टक्क्यांची सवलत बँक देणार आहे. तसेच गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीमध्येही सूट दिली जाणार आहे. बँक ऑफ बडोदाचा सध्याचा गृहकर्जाचा व्याजदर ६.७५ टक्क्यांपासून, तर कार कर्जाचा व्याजदर ७ टक्क्यांपासून सुरू होतो. त्यावरही सवलत मिळेल.
बँक ऑफ बडोदाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्ज लवकर मंजूर व्हावे यासाठी ग्राहक बँकेची वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरूनदेखील अर्ज करू शकतात. बँकेकडून घरपोच सेवाही दिली जाते. तिचाही ग्राहक लाभ घेऊ शकतात. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक एच. टी. सोलंकी यांनी सांगितले की, आगामी सणासुदीच्या काळासाठी आम्ही ही सवलत आणली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना सणासुदीची भेट देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे बँकेसोबत नव्याने जोडल्या जाणाऱ्या ग्राहकांनाही आम्ही गृह व कार कर्जासाठी आकर्षक संधी उपलब्ध करून देत आहोत.
पीएनबीची ‘फेस्टिव्ह ऑफर’
पंजाब नॅशनल बँकेनेही (पीएनबी) ‘फेस्टिव्ह ऑफर’ जाहीर केली आहे. त्याअंतर्गत बँकेने गृह, कार, वैयक्तिक, पेन्शन आणि सोनेतारण कर्जावरील सेवाशुल्क, प्रोसेसिंग शुल्क आणि दस्तऐवज शुल्क माफ केले आहे. पीएनबीचा गृहकर्जाचा व्याजदर ६.८० टक्क्यांपासून, तर कार कर्जाचा व्याजदर ७.१५ टक्क्यांपासून सुरू होतो. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर ८.९५ टक्के आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही सवलत लागू राहील.
एसबीआयने याआधीच व्याजदर कमी केले आहेत. ‘क्रेडिट स्कोअर’वर आधारित कर्जाचा त्यात समावेश आहे. त्याचा व्याजदर ६.७० टक्के असेल. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचा व्याजदर आता एकसमान राहील. त्यातून ७५ लाखांच्या कर्जावर ३० वर्षांत ८ लाख रुपये वाचतील.