Join us

विजय मल्ल्याच्या सुपर यॉट्स, कारवर आता बँकांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 5:32 AM

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याच्या दोन सुपरयॉट्स आणि काही महागड्या कारच्या संग्रहाकडे आता बँकांची नजर वळली आहे.

नवी दिल्ली - बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याच्या दोन सुपरयॉट्स आणि काही महागड्या कारच्या संग्रहाकडे आता बँकांची नजर वळली आहे. कर्जाच्या वसुलीसाठी या मौल्यवान वस्तू बँका ताब्यात घेऊन लिलावात काढू शकतात.मल्ल्या यांच्याकडून १.३ अब्ज डॉलरचे कर्ज वसूल करण्यासाठी बँकांचा एक समूह लंडनमधील न्यायालयात न्यायालयीन लढाई लढत आहे. यॉट्स, कार आणि काही मौल्यवान पेंटिंग्जच्या मालकीविषयक कागदपत्रांची मागणी बँकांनी न्यायालयात केली.या वस्तूंची मालकी मल्ल्याकडे असल्यास त्या ताब्यात घेण्याची कारवाई बँकांकडून सुरू केली जाऊ शकते. या वस्तू एका ट्रस्टच्या मालकीच्या असल्याचा मल्ल्याचा दावा आहे. तथापि, बँकांचा त्यावर विश्वास नाही. या वस्तू मल्ल्याच्याच मालकीच्या असाव्यात असा बँकांना संशय आहे. यासंदर्भातील सुनावणीस मल्ल्या उपस्थित नव्हता. बँकांनी म्हटले की, अनेक मौल्यवान वस्तूंच्या मालकीचा हेतुपुरस्सर गुंता करून ठेवला गेला आहे. अनेक विदेशी कंपन्या आणि एकाधिकारशाही असलेल्या ट्रस्टमध्ये ही मालकी दडविण्यात आली आहे. न्यायाधीश ख्रिस्टोफर हन्कॉक यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.‘ती’ मालमत्ताही त्याचीच असावीयादीतील इंडियन एम्प्रेस ही यॉट ९५ मीटर लांब, तर फोर्स इंडिया नावाची दुसरी यॉट ५० मीटर लांब आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, फोर्स इंडियाची मालकी एका माल्टीस कंपनीकडे आहे. इंडियन एम्प्रेसची मालकी ‘आयझल आॅफ मान’च्या एका कंपनीकडे असल्याचे दिसते. इंडियन एम्प्रेसवर एक मौल्यवान एल्टन जॉन पियानो तसेच उच्च दर्जाची कलाकुसर होती. ही मालमत्ता मूळची मल्ल्याचीच असावी, असा बँकांना संशय आहे.

टॅग्स :विजय मल्ल्या