Join us  

आता बँकेच्या लॉकरमध्ये फक्त 'याच' गोष्टी ठेवता येतील; जाणून घ्या आरबीआयचे नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 4:56 PM

शस्त्रे, ड्रग्ज किंवा औषधे, निषिद्ध किंवा धोकादायक किंवा विषारी वस्तू ठेवण्यास बंदी असणार आहे.

 आपल्यापैकी बरेच जण दागिन्यांपासून ते महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी बँक लॉकर वापरतात. जर तुम्ही देखील बँकेत लॉकर ठेवत असाल किंवा ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित नवीन नियम माहीत असले पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यासाठी बँकांना सूचनाही दिल्या आहेत. आरबीआयचे म्हणणे आहे की, बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर भाड्याने देण्याच्या कराराचे नूतनीकरण करावे लागेल. 

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना बँक लॉकरमध्ये केवळ दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यासारख्या कायदेशीर वैध वस्तू ठेवता येणार आहेत. बँकेसोबतच्या करारात ग्राहकाला कोणत्या प्रकारचे सामान ठेवण्याची परवानगी आहे आणि कोणती नाही हे तपशीलवार सांगितले जाईल. एवढेच नाही तर बँकेचे लॉकर आता फक्त ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जाणार आहेत. हे नॉन-ट्रान्सफरेबल असतील. इंडियन बँक असोसिएशन एक मॉडेल करार करेल. या आधारे बँका त्यांच्या ग्राहकांशी करावयाचे करार तयार करतील. 

बँकेच्या सध्या लॉकर ग्राहकांच्या कराराच्या नूतनीकरणासाठी स्टॅम्प पेपरचा खर्च बँक उचलेल. तर इतर ग्राहकांना बँक लॉकर घेताना कराराच्या स्टॅम्प पेपरची किंमत मोजावी लागेल. अनेक लोक आफल्या बँक लॉकरमध्ये असे साहित्य ठेवतात, जे कायदेशीररित्या वैध नाहीत. कधीकधी ते हानिकारक देखील असते. त्यामुळे आता आरबीआयने हेही स्पष्ट केले आहे की, ग्राहक आपल्या लॉकरमध्ये कोणते साहित्य ठेवू शकत नाहीत. यामध्ये आता ग्राहकांना आपल्या लॉकरमध्ये रोख किंवा विदेशी चलन ठेवता येणार नाही. यासोबतच शस्त्रे, ड्रग्ज किंवा औषधे, निषिद्ध किंवा धोकादायक किंवा विषारी वस्तू ठेवण्यास बंदी असणार आहे.

याचबरोबर, बँक आणि ग्राहक यांच्यात करार केला जाईल. त्यामध्ये बँकेला अनेक जबाबदाऱ्यांतून दिलासा मिळणार आहे. उदाहरणार्थ, पासवर्ड किंवा बँकेच्या लॉकरच्या चावीचा गैरवापर किंवा बेकायदेशीर वापर झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. त्याची जबाबदारी फक्त ग्राहकाची असेल. तसेच, ग्राहकाला त्याचे सामान लॉकरमध्ये ठेवण्याचा अधिकार असणार आहे. बँकेला त्याचे संरक्षण करावे लागेल आणि जर बँकेने तसे केले नाही तर ग्राहकाला वेळोवेळी संबंधित नियमांनुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल.

टॅग्स :बँक