Join us  

बँकांनी दिल्या १.२३ लाख नोकऱ्या; कर्मचारी संख्या ६१ टक्क्यांनी वाढली, १० वर्षांतील मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 5:59 AM

आर्थिक वर्ष २०११मध्ये बँकिंग क्षेत्रात १,२५,००० नोकऱ्या दिल्या, तर २०१२ या आर्थिक वर्षात १,२४,००० जणांना भरती करण्यात आले.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार २०२३ या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल १,२३,००० नोकऱ्या दिल्या. २०२२ च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल ६१ टक्क्यांनी वाढली आहे. वार्षिक आकडेवारीचा विचार करता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७.४ टक्क्यांनी वाढून १७.६ लाखांवर पोहोचली आहे. 

स्टाफिंग एजन्सी एक्सफेनोच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार सर्वांत मोठ्या १५ बँकांनी २०२३मध्ये प्रत्येक दिवशी सरासरी ३५० कर्मचाऱ्यांची भरती केली. यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, इंडसइंड, आयडीएफसी फर्स्ट, बंधन व एयू बँक आदींचा समावेश आहे.

...यामागची नेमकी कारणे कोणती? जाणकारांच्या मते किरकोळ कर्जाची वाढती मागणी, गृहकर्जाच्या मागणीत वाढ आणि अर्थव्यवस्थेला मिळालेली गती यामुळे बँकांमध्ये अधिक मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. चांगल्या विकासदरामुळे ग्रामीण भागातही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक उद्योजक संधीचा लाभ उठवण्याच्या तयारीत आहे. बँका मोठ्या प्रमाणावर निमशहरी तसेच ग्रामीण भागात शाखा सुरू करीत आहेत. आपला विस्तार वाढवत आहेत. त्यामुळे त्यांना वाढीव मनुष्यबळाची गरज भासत आहे.

आर्थिक वर्ष २०११मध्ये बँकिंग क्षेत्रात १,२५,००० नोकऱ्या दिल्या, तर २०१२ या आर्थिक वर्षात १,२४,००० जणांना भरती करण्यात आले. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि बंधन बँकेने चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत तब्बल ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

टॅग्स :नोकरीबँक