मुंबई : देशातील बँकांना ग्राहक सेवांबाबत देण्यात आलेले मानांकन सार्वजनिक करण्याचा भारतीय बँकिंग संहिता आणि मानांकन मंडळ अर्थात बीसीएसबीआयचा विचार आहे. संहिता पालनाच्या आधारावर सदस्य बँकांना मंडळाकडून मानांकन दिले जाते.
मंडळ एक स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था असून ग्राहकांच्या अधिकारांशी संबंधित बँकिंग संहिता आणि मानकांवर काम करते. गेल्या वर्षीपासून बँकांना मानांकन दिले जाते; मात्र त्यांचा खुलासा केवळ संबंधित बँकांकडे केला जातो. मंडळाने गेल्या वर्षी सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांचे मानांकन जाहीर केले. तथापि, बँकांना देण्यात आलेल्या विशेष रेटिंगचा खुलासा केला नाही. (प्रतिनिधी)
बीसीएसबीआयचे प्रमुख ए. सी. महाजन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या वर्षीच्या मानांकनाची माहिती केवळ बँकांना देण्यात आली होती आणि आमच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली; मात्र या आर्थिक वर्षापासून आम्ही बँकांना देण्यात आलेले विशेष रेटिंग सर्वासाठी खुले करणार आहोत. रेटिंग सर्वासाठी खुले झाल्याने बँकांद्वारे ग्राहक सेवांवर आणखी भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.