Vijay Mallya News : किंगफिशर एअरलाइन्सविरुद्धच्या कर्जवसुली प्रक्रियेला विजय मल्ल्यानं कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. किंगफिशर एअरलाइन्सवर जवळपास ६२०० कोटी रुपयांचं कर्ज होतं असा दावा विजय मल्ल्याने केलाय. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम वसूल केली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ही याचिका ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती आर. देवदास यांच्यासमोर बुधवारी या प्रकरणाची संक्षिप्त सुनावणी झाली.
जोपर्यंत संबंधित पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत आपण अंतरिम दिलासा मागत नसल्याचं विजय मल्ल्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील साजन पूवय्या यांनी उच्च न्यायालयात सांगितलं. न्यायालयानं १० बँका, एक वसुली अधिकारी आणि असेट रिकंस्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावली आहे. त्यांना याचिकेत पक्षकार बनवण्यात आलं आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला विजय मल्ल्यानं अनेक राष्ट्रीय आणि खासगी बँकांविरुद्ध (स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि असेट मॅनेजमेंट कंपनीसह) वसुली प्रक्रियेला आव्हान दिलं होते. वसुलीची प्रक्रिया तूर्तास थांबवावी आणि अंतरिम स्थगिती आदेश जारी करावा, अशी विनंती मल्ल्यानं याचिकेत केलीये.
यापूर्वी मल्ल्यानं केला होता दावा
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला होता की, बँकांनी ६,२०३ कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त व्याज वसूल केलं आहे. ही डेट रिकव्हरी ट्रिब्युनलनं निश्चित केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेत विजय मल्ल्याची १४,१३१.६ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आल्याचं सांगितलं होतं.
विजय मल्ल्या २०१६ मध्ये ब्रिटनला पळून गेला होता. किंगफिशर एअरलाइन्सला अनेक बँकांनी दिलेलं कर्ज थकवल्याप्रकरणी तो भारतात वाँटेड आहे.