Join us

'देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात 958 अब्ज रुपयांचा घोटाळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 9:29 AM

बँकर्संकडून यासाठी लचर नियमावली आणि बँक अधिकाऱ्यांच्या फसवणुकीस जबाबदार ठरवले आहे

नवी दिल्ली - देशातील सरकारी बँकांच्या घोटाळ्यात मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. कारण, यंदाच्या वर्षातील सहामाही कार्यकाळात सरकारी बँकेत एकूण 958 अब्ज रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेतील भाषणात एका प्रश्नावेळी विचारलेल्या उत्तरावर ही माहिती दिली. सितारमण यांनी राज्यसभा सभागृहात बँक घोटाळ्याचा तपशील सांगितला. 

सरकारी बँकांकडून एप्रिल ते सप्टेंबर या सहामाही कार्यकाळात घोटाळा आणि फसवणुकीसंदर्भातील 5743 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामध्ये गेल्यावर्षी करण्यात आलेल्या घोटाळ्याचीच सर्वाधिक प्रकरणे आहेत. तर, यंदाच्या वर्षी 1 हजार प्रकरणांध्ये 25 अब्ज रुपयांचा घोटाळा झाल्याचं सितारमण यांनी सांगितलं. भारतीय स्टेट बँकेकडून सर्वाधिक 254 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने 108 अब्ज कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार दिली आहे. तर, बँक ऑफ बडोदाने 83 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. 

बँकर्संकडून यासाठी लचर नियमावली आणि बँक अधिकाऱ्यांच्या फसवणुकीस जबाबदार ठरवले आहे. मात्र, या बँकांचे नुकसान भरुन काढण्याचा सरकार पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे अर्थमंत्री सितारमण यांनी सांगितलं. तसेच, बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी उपाय करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या 2 वर्षात निष्क्रीय झालेल्या कंपन्यांच्या 3.38 लाख खात्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने 2016 मध्ये बँक घोटाळा आणि दिवाळीखोरीसंदर्भात कडक कायदा केला आहे. त्याद्वारे फसवणूक आणि घोटाळ्यामुळे झालेल्या 10 लाख कोटी रुपयांचा तोटा भरुन काढण्यासाठी होणार आहे.  

टॅग्स :निर्मला सीतारामनबँकिंग क्षेत्रस्टेट बँक आॅफ इंडियाराज्यसभा