नवी दिल्ली : युनायटेड ब्रेवरीजमधील विजय मल्ल्याच्या मालकीची १६.१५ टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँक समूहाने चालविली आहे. ५,५०० कोटी रुपये मूल्याचे हे समभाग विकण्यासाठी बँक समूहाने एसबीआय कॅपिटलशी बोलणी सुरू केली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
विजय मल्ल्याच्या मालकीच्या समभागांची ‘ब्लॉक डील’ पद्धतीने विक्री केली जाणार आहे. कर्ज घेताना मल्ल्याने तारण दिलेल्या नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या होत्या. या मालमत्ता पुन्हा बँकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा न्यायालयाने याच आठवड्याच्या दिला आहे.
प्रकरण काय ?
किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात मल्ल्या यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी करीत असतानाच मल्ल्या यांनी देशातून पलायन केले होते.
बँका चालू तिमाहीतच मल्ल्या यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करू शकतील. आपण बँकांना तडजोडीचे कित्येक प्रस्ताव दिले असल्याचा दावा मल्ल्या यांनी यापूर्वी केला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, मल्ल्या निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मालमत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात द्याव्यात. त्याआधी बंगळुरूच्या ऋण वसुली प्राधिकरणाने बँकांना मल्ल्या यांच्या मालमत्ता विकण्याची परवानगी दिली होती.
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला बँका देणार दणका; 'ब्लॉक' डीलची तयारी सुरू
विजय मल्ल्याच्या मालकीच्या समभागांची ‘ब्लॉक डील’ पद्धतीने विक्री केली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:18 AM2021-05-30T10:18:29+5:302021-05-30T10:18:50+5:30