Join us  

बँकांनी सायबर सुरक्षा चोख ठेवावी

By admin | Published: June 04, 2016 2:46 AM

डिजिटल तंत्रज्ञानामुळे आॅनलाइन बँकिंगकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी बँकांनी आपल्या सायबर सुरक्षेकडे चोख लक्ष द्यावे

मुंबई : डिजिटल तंत्रज्ञानामुळे आॅनलाइन बँकिंगकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी बँकांनी आपल्या सायबर सुरक्षेकडे चोख लक्ष द्यावे असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. सध्या नियमित बँकिंग व्यवहाराच्या तुलनेत आॅनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. पैशाच्या हस्तांतरणासाठीही लोक प्रामुख्याने नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. याखेरीज अन्य व्यवहार किंवा मग बँकांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांमध्येही इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक व्यवहार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही पद्धतीचे हँकिंग होऊ नये अथवा आॅनलाइन व्यवहारात गंडा घातला जाऊ नये, याकरिता बँकांनी आपल्या संगणकीय यंत्रणा आणि आॅनलाइन व्यवस्था यातील सुरक्षेच्या मुद्द्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. आजच्या घडीला सरकारी बँकांतून होणाऱ्या व्यवहारापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हे इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून होतात, तर खाजगी बँकांत हेच प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच, यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)