Join us

बँकांना दणका! ATM मध्ये पैसे नसल्यास बँकांना भरावा लागेल दंड; RBI चा नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 9:32 PM

बँकेच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणं यात ग्राहकांची कोणतीही चूक नसते आणि याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागतो.

ATM मध्ये डेबिट कार्ड टाकलं आणि पैसे निघाले नाहीत असं अनेकदा होतं. मशिनमध्ये पुरेसे पैसे नाहीत असा मेसेज तुम्हाला अनेकदा दिसला असेल आणि ऐनवेळी तुमचा हिरमोड होतो. मग दुसरं एटीएमच्या शोधात तुम्हाला फिरावं लागतं आणि यात वेळ खर्ची होतो. बँकेच्याएटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणं यात ग्राहकांची कोणतीही चूक नसते आणि याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागतो. याच मुद्द्याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घेतली आहे. (Banks will give fine if atm run out of cash know RBI new instruction)

एटीएममध्ये पैसे नसतील तर संबंधित बँकेला दंड ठोठावण्यात येणार आहे. तसा नियमच १ ऑक्टोबरपासून आरबीआयकडून लागू केला जाणार आहे. त्यामुळे देशातील बँकांना मोठा दणका बसला आहे. बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसतात या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत. त्यामुळे बँकांनी आपल्या एटीएम सेवेवर आता अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, असं आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 

आरबीआयच्या नव्या नियमानुसार, एखाद्या एटीएममध्ये एका महिन्यात १० तासांहून अधिक काळ पैसे उपलब्ध नसतील तर अशा परिस्थितीत संबंधिक बँकेवर १० हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. काही बँका एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी एखाद्या थर्ड पार्टी कंपनीची सेवा घेतात. पण अशाही परिस्थितीत नियमाचा भंग झाल्यास त्याचा दंड बँकांनाच भरावा लागणार आहे. 

टॅग्स :एटीएमबँकबँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँक