नवी दिल्ली : आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी केले.त्यांनी सांगितले की, भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता यात समतोल साधण्यास सरकार, ग्राहक आणि नागरी समाज समुदाय यांनी एकत्रित काम करायला हवे. राय यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आधारच्या डाटाबेसचे दोन भाग आहेत. एक म्हणजे नाव, वय, पत्ता यांसारखा जनसांख्यिकीय डाटा आणि दुसरा म्हणजे बायोमेट्रिक डाटा. लोक जेव्हा डाटाबेस सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतात, तेव्हा त्यांना बायोमेट्रिक डाटा अपेक्षित असतो. बायोमेट्रिक डाटा फुटल्याची एकही घटना अजून तरी समोर आलेली नाही. आधार डाटाबेसला कमाल सुरक्षा देण्यात आली आहे. वाईटातल्या वाईट डाटा फुटीतही हा डाटा सुरक्षित राहिला आहे. जिओवर हल्ला झाला, तेव्हा त्यांचा डाटा फुटला होता, पण आधारचा डाटा सुरक्षित राहिला.ओळख पडताळणीसाठी जिओसह इतरही अनेक कंपन्यांना आधार डाटाबेसचा संपर्क देण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधले असता, राय यांनी सांगितले की, होय पडताळणीसाठी संपर्क सुविधा देण्यात आली आहे.
आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:10 AM