नवी दिल्ली : सरकारने डाळवर्गीय पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) ४२५ रुपयांची घसघशीत वाढ केली आहे. त्याच प्रमाणे तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत ६० रुपये वाढ केली. तांदळाचा आधारभूत भाव आता १,४७० रुपये झाला आहे. आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१६-२०१७ या खरीप हंगामासाठी हे भाव असतील. देशात डाळींच्या उत्पादनात चांगली वाढ व्हावी व आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने येत्या खरीप हंगामासाठी डाळवर्गीय पिकांसाठी आधारभूत किमतीत अतिरिक्त बोनससह क्विंटलमागे ४२५ रुपयांची वाढ केली आहे. त्याचप्रमाणे तेलबियांच्या किमान आधारभूत भावातही चांगली वाढ केली आहे. सरकारने २०१५-२०१६ च्या खरीप हंगामात सामान्य तांदळाची किमान आधारभूत किंमत क्विंटलला १,४१० रुपये आणि ग्रेड एची किंमत १,४५० रुपये निश्चित केली होती. या महिन्यात नैऋत्य पावसाचे आगमन होताच पेरणीचा हंगाम सुरू होईल. या हंगामात भाताची मुख्य लागवड होते. सामान्य तांदळाची किमान आधारभूत किंमत क्विंटलमागे ६० रुपये वाढवून आता १,४७० रुपये, तर ग्रेड एच्या तांदळाची किंमत क्विंटलमागे १,५१० रुपये झाली आहे. देशात तांदळाचा पुरेसा साठा असल्यामुळे सरकारने किमान आधारभूत किमतीत मर्यादित वाढ केली आहे. त्यातून उत्पादन खर्च वसूल होईल.
डाळीची आधारभूत किंमत वाढली
By admin | Published: June 02, 2016 2:47 AM