नवी दिल्ली : मर्यादित पुरवठा आणि स्टॉकिस्टांकडून वाढलेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीतील ठोक धान्य बाजारात गुरुवारी बासमती तांदळाचे भाव आणखी ३00 रुपयांनी वाढले. गेल्या ४ दिवसांपासून तांदूळ सातत्याने महाग होत आहे.इराणने घातलेली आयात बंदी, तसेच इराकने कमी केलेली मागणी यामुळे भारतात बासमती तांदळाच्या किमती गेल्या महिन्यात घसरल्या होत्या. मात्र, यंदा भारतात तांदळाच्या उत्पादनात घट होणार असल्याच्या बातम्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या आहेत. औद्योगिक संघटना असोचेमने नुकतेच एक सर्वेक्षण जारी करून तांदूळ महागण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर स्टॉकिस्टांनी बासमती तांदूळ खरेदी करण्याचा सपाटा लावला. परिणामी, तांदळाच्या किमती भराभर वाढू लागल्याआहेत. गुरुवारी दिल्लीतील बाजारात सामान्य बासमतीचा भाव ५,१00 रुपयांवरून ५,४00 रुपये क्विंटल झाला. त्याचप्रमाणे पुसा १,१२१ या जातीच्या बासमती तांदळाचा भाव ४,८00 रुपयांवरून ५,000 रुपये क्विंटल झाला. श्रीलाल महल तांदळाचा भाव ३00 रुपयांनी वाढून १0,८00 रुपये क्विंटल झाला. विविध प्रकारच्या बिगर बासमती तांदळाचा भाव १,७00 ते २,४५0 रुपये क्विंटल या दरम्यान राहिला. वाटाण्याला तापमानाचा फटकादरम्यान, राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील वाटाण्याच्या पिकाला नोव्हेंबरअखेरपर्यंत सतत राहिलेले उच्च तापमान आणि हवामानात झालेल्या अनपेक्षित बदलामुळे मोठा फटका बसला. बुंदी जिल्ह्यातील वाटाण्याचा पुरवठा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातला प्रामुख्याने होतो.वाटाण्याच्या हंगामामध्ये बडानायगाव येथील अशोकनगरमधून डिसेंबर महिन्यात रोज पुढील तीन महिने ५० ट्रक्स भरून माल बाहेर पाठविला जातो, असे रामधन सैनी या शेतकऱ्याने सांगितले.हिंदोली भागातील २८ बिघा जमिनीवर सैनी वाटाण्याचे पीक घेतात. पेरणीच्या महिन्यात वाटाण्याचे बियाणेच बाजारात उपलब्ध झाले नसल्यामुळे व नंतर उच्च तापमानामुळे पिकाला मोठा फटका बसल्याचे ओम प्रकाश सैनी या दुसऱ्या शेतकऱ्याने सांगितले.गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीने लागवडीसाठीच्या बियाणाला नष्ट केले व त्यामुळे उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्धच झाले नाही. वाटाण्याचे बियाणे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारनेही काही मदत केली नाही, अशी तक्रारही या शेतकऱ्यांनी केली. वाटाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (वृत्तसंस्था)
बासमती तांदूळ ३00 रुपयांनी महागला
By admin | Published: November 20, 2015 1:52 AM