नवी दिल्ली : बिटकॉईनबाबत भारत सरकारने गुंतवणूकदारांना सावध केले आहे. बिटकॉईनला कोणतेही आंतरिक मूल्य नाही, असे सरकारने म्हटले असून, बिटकॉईनची तुलना कुख्यात पाँझी योजनांशी केली आहे.वित्तमंत्रालयाने एक निवेदन जारी करून हा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, बिटकॉईन हे आभासी चलन (व्हर्च्युअल करन्सी) आहे. त्याला कोणत्याही प्रकारे मालमत्तेचा पाठिंबा नाही, त्यामुळे त्याची किंमत ही पूर्णत: काल्पनिक आहे. अशा प्रकारच्या पाँझी योजनांच्या सापळ्यात अडकू नये यासाठी ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे.अमेरिकेत आलेल्या एका इटालियन नागरिकाच्या नावावरून नामकरण झालेल्या पाँझी योजनांत अल्पकाळात मोठ्या परताव्याची आमिषे दाखविली जातात. या योजनांत आधीच्या गुंतवणूकदारांना नंतरच्या गुंतवणूकदारांच्या पैशांतून मोबदला दिला जातो. पैशाची जावक ही जेव्हा आवकच्या तुलनेत जास्त होते, तेव्हा पाँझी योजनेचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. असेच आभासी चलनाचे होऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, आभासी चलनास कोणतेही आंतरिक मूल्य नाही, तसेच त्याला कोणत्या मालमत्तेचे पाठबळही नाही. बिटकॉईन आणि अन्य आभासी चलनाची किंमत ही पूर्णत: काल्पनिक आहे. त्याच्या किमती अचानक उसळतात, तसेच कमालीच्या अस्थिरही असतात. पाँझीयोजनांचा फुगा फुटल्यानंतर जी जोखीम येते, तीच आभासी चलनातही आहे. (वृत्तसंस्था)>आभासी चलनापासून दूर राहावित्त मंत्रालयाने म्हटले की, बिटकॉईन हे डिजिटल स्वरूपात साठवलेले असतात. हॅकिंग, पासवर्ड विसरणे आणि मालवेअर (व्हायरस) हल्ला याचा त्यांना धोका आहे. अशा स्थितीत आभासी चलन कायमस्वरूपी गमावलेही जाऊ शकते. हे चलन एन्क्रिप्टेड असल्यामुळे दहशतवाद, तस्करी, अमलीपदार्थांची वाहतूक, मनी लाँड्रिंग यांसारख्या बेकायदेशीर व घातपाती कारवायांत त्यांचा वापर होण्याचा धोका आहे. निवेदनात म्हटले आहे की, आभासी चलन हे कायदेशीर चलन नाही. भारतात त्याला नियामकीय परवानगी आणि संरक्षण नाही. खरे म्हणजे ते चलन नाही आणि पैसाही नाही. कारण भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने कोणत्याही आभासी चलनाला मान्यता दिलेली नाही. याउलट आभासी चलनापासून दूर राहण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २0१३, फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ असा तीन वेळा दिला आहे.
सावधान, बिटकॉईनला काहीच मूल्य नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:42 AM