Join us  

बाजाराची वाटचाल होणार सावध

By admin | Published: June 06, 2016 2:16 AM

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा, देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये चौथ्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, सुधारलेले शेती उत्पादन, पावसाचा जाहीर झालेला सुधारित अंदाज अशा सकारात्मक

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीभारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेली सुधारणा, देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये चौथ्या तिमाहीत झालेली चांगली वाढ, सुधारलेले शेती उत्पादन, पावसाचा जाहीर झालेला सुधारित अंदाज अशा सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजारामधील वाढ गतसप्ताहामध्येही कायम राहिली. मात्र आगामी सप्ताहात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याने बाजाराची भूमिका सावध असेल, असे संकेत मिळत आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी गत सप्ताहामध्ये जाहीर झाली आणि बाजारामध्ये उत्साहाचा संचार झाला. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.९ टक्के राहिला. संपूर्ण वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.६ टक्के एवढा राहिला. गेल्या पाच वर्षांमधील हा उच्चांक आहे. या आकडेवारीसोबतच गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशातील उत्पादन क्षेत्रातील वाढ ९.३ टक्क्यांनी वाढल्याने मंदीचे ढग काहीसे विरळ होण्याची शक्यता वाटू लागली आहे. याशिवाय देशातील कृषी क्षेत्रामधील उत्पादनही वाढले आहे. या सर्वच घटकांचा बाजारावर अनुकूल परिणाम होऊन खरेदीसाठी गर्दी झाली आणि बाजाराची चढती भाजणी कायम राहिली.सप्ताहाच्या अखेरीस देशातील पावसाबाबतचा सुधारित अंदाज जाहीर झाला. यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे यामधून जाहीर झाल्याने सर्वांनाच समाधान वाटत आहे. या अंदाजाचे बाजारानेही स्वागत केले आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. याचेही अनुकूल पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटू लागलेले दिसले.रुपया डॉलरच्या तुलनेत घसरलेला गतसप्ताहामध्ये दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये ०.२७ टक्क्यांनी घट झाली. आगामी सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅँकेतर्फे पतधोरणाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठकही होत आहे. त्यावर बाजार अवलंबून आहे.