मनोज गडनीस, मुंबई दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळविण्यात ‘आप’ला यश आले असले तरी, शेअर बाजारात मात्र यामुळे काहीशा चिंतेचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे, उद्योग व भांडवलशाही विरोधात केजरीवाल यांनी घेतलेली भूमिका!मतमोजणीच्या दिवशी जरी सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली असली तरी, दिल्लीच्या निवडणुकांच्या अगोदर वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केलेले ‘ओपिनियन पोल’ आणि मतदानानंतर प्रसारित केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये ‘आप’ला सत्ता मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते. याचा परिणाम शेअर बाजाराच्या कामगिरीवरही जाणवत होता. सलग पाच सत्रांत सेन्सेक्समध्ये घसरण नोंदली गेली.स्थानिक अथवा एखाद्या राज्याची निवडणूक आणि शेअर बाजार याचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही, तरीही दिल्ली निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर का होत आहे, याबाबत शेअर बाजार विश्लेषक एस.एम. मेहता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुळात अन्य राज्यांच्या तुलनेत दिल्ली ही राजधानी असल्याने तेथील निवडणुकीला कायमच महत्त्व असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय, स्थिर सरकार यांचा मोठा प्रभाव पडतो. २०१३मध्ये अरविंद केजरीवाल यांनी वीज माफी, पाणी मोफत या घोषणा करताना त्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावला होता. त्यामुळे मुळातच खासगी कंपन्यांची त्यांच्या विरोधात नाराजी होती. केजरीवाल यांचे गेल्या सरकारमधील निर्णय आणि त्या निर्णयाचा परिणाम होणाऱ्या कंपन्या, याच शेअर बाजारातील प्रमुख अशा कंपन्या आहेत. त्यात आता पुन्हा खासगी कंपन्यांच्या विरोधात त्यांनी बडगा उचलण्यास सुरुवात केली तर त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया बाजारावरही उमटू शकेल.
बाजाराला धसका!
By admin | Published: February 11, 2015 6:31 AM