प्रसाद गो. जोशी
कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागण्याची भीती निर्माण होऊन शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याने बाजार खाली-खाली जात असलेला गतसप्ताहात दिसून आला. या सर्वच बाबींमुळे शेअर बाजारावर मंदीचे ढग दिसून येत आहेत. गतसप्ताहात शेअर बाजार खुला झाला तोच किरकोळ वाढीने. त्यानंतर सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ४८,४७८.३४ ते ४७,२०५.५० अंशांदरम्यान हेलकावत अखेरीस तो ९५३.५८ अंशांची डुबकी घेत ४७,८७८.४५ अंशांवर बंद झाला.
परकीय वित्तसंस्थांनी काढली रक्कम
भारतीय शेअर बाजामरामधून चालू महिन्यात परकीय वित्तसंस्थानी मोठ्या प्रमाणावर रक्कम काढली आहे. १ ते २३ एप्रिल या कालावधीमध्ये या संस्थांनी ८,६७४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तसेच या काळामध्येच या संस्थांनी १,०५२ कोटी रुपयांचे बॉण्डस् खरेदी केले आहेत. याचा स्पष्ट अर्थ या संस्थांनी चालू महिन्यात भारतामधून ७,६२२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. याआधीचे तीन महिने या संस्था भारतात गुंतवणूक करीत होत्या.
सौदापूर्तीचा आठवडा
आगामी सप्ताहामध्ये कोरोना आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यावर बाजाराची दिशा ठरणार आहे. या सप्ताहामध्ये एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती असल्यामुळे मोठी उलाढाल शक्य आहे.