मुंबई : कोरोनाचे कमी होत असलेले रुग्ण, रुपयाची बळकटी आणि भारतीय स्टेट बँकेचे आलेले चांगले निकाल यामुळे दोन दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बााजारामध्ये जोरदार तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ९७६ अंशांनी वाढून ५०,५०० च्या पुढे गेला आहे. निफ्टीनेही १५ हजारांची पातळी ओलांडली आहे. बाजाराच्या या उसळीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये २.४१ लाख काेटी रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजार खुला झाल्यापासूनच तेथे तेजीचे वारे वाहात होते. दिवसअखेर बाजार बंद होताना संवेदनशील निर्देशांक ९७५.६२ अंशांनी वाढून ५०,५४०.४८ अंशांवर बंद झाला. ३० मार्चनंतरची बाजारात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. बँका तसेच वित्तीय संस्थांच्या समभागांमध्ये मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी केवळ २ कंपन्यांचे दर लाल रंगामध्ये बंद झाले, हे विशेष होय. राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही तेजीचेच वातावरण होते. येथील निर्देशांक (निफ्टी) २६९.२५ अंशांनी वाढून १५,१७५.३० अंशांवर बंद झाला. बऱ्याच कालावधीनंतर निफ्टीने १५ हजारांची पातळी ओलांडल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
गुंतवणूकदार मालामालशेअर बााजारातील चांगल्या वाढीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये २.४१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व कंपन्यांचे भांडवल वाढून २१८.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गुंतवणूकदारांचा हा लाभ कागदोपत्री असला तरी त्यामुळे काहीसा दिलासा नक्कीच मिळत असतो.