आज तुम्हाला प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात आणि कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मोमोजचे स्टॉल दिसतील. गरमागरम मोमोज आणि लाल-मसालेदार चटणी म्हणजे... वाह! वाचून तुमच्या तोंडाला पाणीच सुटलं असेल. या बद्दल जरा नंतर बोलू, आता त्याच्या बिझनेसबद्दल बोलूया. एका छोट्याश्या टेबलावर मोमोज विकणारा किती कमाई करेल याची कल्पना करा.
एका अंदाजानुसार महिन्याला 20-30 हजार किंवा 40-50 हजार. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यानं मोमोज विकून 2000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. आश्चर्य वाटून घेऊ नका. आज ते दररोज 6 लाखांहून अधिक मोमोज विकतात, तसंच दरमहा लाखो आणि कोटींची कमाई करतात. आम्ही बोलत आहोत वॉव मोमोचे (Wow Momo) सह-संस्थापक सागर दर्यानी (Sagar Daryani) यांच्याबद्दल.
आपल्या मुला-मुलीनं शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस अशी नोकरी करावी, ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. कुटुंब मध्यमवर्गीय असेल, तर त्यांनी शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी, अशी कुटुंबीयांची इच्छा असते. सागर दर्याणी यांच्या आई-वडिलांनाही तेच हवं होतं. पण सागर यांनी वेगळंच काही ठरवलेलं. कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत असलेल्या सागर यांनी जेव्हा आपल्या वडिलांना मोमोज विकायचे असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
...तरी थांबले नाही
सागर यांचं बोलणं ऐकून त्यांचे वडील संतापले. त्यांनी मुलाला टोमणा मारला आणि म्हणाले, 'माझा मुलगा मोमो विकेणार!' वडिलांचे शब्दही सागरला रोखू शकले नाहीत. 2008 मध्ये सागर आणि त्याचा मित्र विनोद कुमार यांनी एका छोट्या दुकानातून मोमोजचा व्यवसाय सुरू केला. दोघांनीही त्यांच्या बचतीतून 30000 रुपये गुंतवले आणि फक्त सिंगल टेबल आणि 2 पार्ट टाईम शेफ घेऊन व्यवसाय सुरू केला.
कशी सूचली कल्पना
अनेकदा रात्री उशिरा अभ्यास करताना सागर आणि त्यांचे मित्र मॅगी, पिझ्झा, बर्गर ऑर्डर करून खात असत. एके दिवशी अचानक त्यांच्या मनात विचार आला की जेव्हा परदेशी कंपन्या भारतात येऊन व्यवसाय करू शकतात तर भारतीय कंपनी परदेशात का जाऊ शकत नाही. त्या दिवसापासून त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. एक काकू त्यांच्या घराजवळ मोमोज बनवायच्या. त्यांच्या स्टॉलबाहेर लांबच लांब रांगा असायची. सागर यांच्या मनात कल्पना आली. त्यांना मोमोजचा ब्रँड बनवायचा होता आणि म्हणून त्यांनी वॉव मोमोज सुरू केले.
अनेक चढउतार आले
सुरुवातीची 2 वर्षे खूप कठीण गेली. त्यांच्याकडे पैसा नव्हता, जागाही नव्हती. मोजकेच लोक होते. अशा परिस्थितीत दोघांनाही एक कल्पना सुचली. कंपनीचे नाव आणि लोगो असलेला टी-शर्ट घेतला. दिवसभर ते तेच घालून फिरायचे. वॉव मोमोज बद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून तो जिथे ते जायचे तिथे ते टीशर्ट घालायचे. लोक मोमोजचे सँपल्स चाखायचे. चाखल्यानंतर लोक नक्कीच खाण्यासाठी येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. साध्या मोमोजला ट्विस्ट द्यायला सुरुवात केली. स्टीम मोमोज ऐवजी तंदुरी मोमोज, फ्राय मोमोज सारखे प्रकार ते लोकांना सर्व्ह करू लागले आणि त्यांची ही कल्पना हीट ठरली.
2000 कोटींची कंपनी
कोलकात्यापासून सुरू झालेला प्रवास आता हळूहळू विस्तारायला लागला. छोटी दुकानं आऊटलेटमध्ये बदलू लागली. वाह मोमो फ्रँचायझी आउटलेट्स देशभरात उघडत आहेत. आज दररोज 6 लाख मोमोची विक्री होत आहे. त्यांच्याकडे देशातील 26 राज्यांमध्ये 800 हून अधिक ठिकाणी पॉईंट ऑफ सेल आहे. आज कंपनीचे मूल्यांकन 2000 कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. Wow Momo नं आतापर्यंत ६८.५ मिलियन डॉलर्सचा निधी उभारलाय. सागर दर्याणी यांनी कोणतेही काम लहान मानलं नाही, त्यामुळेच आज ते कोट्यवधींचा व्यवसाय करतायत.