Join us

बीअर महागणार, कंपन्यांकडून दरवाढ करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 7:39 PM

कंपन्या मोठी दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.

गरमीच्या काळात बीअर कंपन्यांची विक्री आणि कमाई मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु आता बीअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. बीअर तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रॉ मटेरिअल्सच्या किंमती वाढल्यानं कंपन्यांनी बीअरची किंमत वाढणार आहे. ब्रुअर्स बीअरची किंमत १०-१५ टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करत आहेत.

भारतात अल्कोहोलच्या किंमती राज्य सरकारांकडून निश्चित केल्या जातात. तेलंगण आणि हरियाणामध्ये यापूर्वीच बीअरचे दर वाढले आहेत. ब्रुअर्सच्या मागणीवर अन्य राज्यांकडूनही हा निर्णय घेतला जाणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशनची किंमतही वाढली आहे. या कारणांमुळे बीअरच्या किंमती वाढवल्या गेल्या पाहिजेत, असं ब्रुअर्सचं म्हणणं आहे.

‘अल्कोहोल तयार करणाऱ्या कंपन्या सरकराकडे दरवाढ करण्याची मागणी करत आहेत,’ अशी माहिती ईटीनं बडवायझर आमि होएगार्डन बीअर तयार करणारी कंपनी AB InBev च्या हवाल्यानं म्हटलंय. “कमोडिटीज आणि नॉन कमोडिटिजच्या किंमती सध्या कमी होणार नाही. ग्लोबल सप्लाय चेनमधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर यांचेही दर वाढत आहेत. पॅकेजिंग मटेरिअल्सदेखील महाग झाले आहेत,” असं कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

जवाच्याकिमतीतवेगानंवाढगेल्या काही महिन्यांपासून जवाच्या किमतीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. एका वर्षात जवाच्या दरात ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यात गेल्या तिमाहीत दरात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जव उत्पादक देश आहे. तर युक्रेन जगातील चौथ्या क्रमांकाचा जव उत्पादक देश आहे. सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जवाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जवाच्या दरात आणखी वाढ होताना दिसतेय. पुढील पीक येईपर्यंत अमेरिका आणि युरोपियन निर्बंध कायम राहिल्यास किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतात मार्चते जुलैदरम्यान ४० ते ४५ टक्के बीअरची विक्री होते. सलग २ सीजन खराब झाल्यानंतर यावेळी बीअरची विक्री वार्षिक आधारावर ४० टक्क्यांनी वाढण्याची कंपन्यांची अपेक्षा होती. २०२० मध्ये जेव्हा देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले होते, तेव्हा कंपन्यांना हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकावी लागली होती.

टॅग्स :व्यवसाय