मुंबई-
मद्यप्रेमींनाही आता महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण बीयरच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कच्च्या मालाच्या दरात दुपटीनं वाढ झाल्याचा दावा बीयर निर्मात्या कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे बीयरच्या किमतीत वाढ केल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही असं कंपन्यांचं म्हणणं आहे.
बीयरसाठी लागणारा कच्चा माल जसं की जव, बाटलीच्या निर्मितीसाठीची काच आणि पॅकेजिंग सामानाच्या दरात वाढ झाली आहे. बीयरच्या किमतीत वाढ करुन याची भरपाई होऊ शकेल असं कंपन्यांचं म्हणणं आहे. समोर आलेल्या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत जवाच्या किमतीत दुपटीनं वाढले आहेत. याशिवाय लेबल, कार्टन आणि बॉटल क्राऊनचा दरही २५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे बीयरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ग्लास तयार करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांत काचेच्या बाटल्यांच्या किमतीत वाढ केली आहे. याचा परिणाम बीयरच्या किमतीवर होऊ शकतो. कच्च्या मालाचा दर वाढल्यामुळे बीयरच्या किमतीत वाढ करणं किंवा बीयर दिले जाणारे डिस्काऊंट रद्द करणं हेच पर्याय आमच्या हातात आहेत, असं DeVANS मॉडर्न ब्रुअरीजचे एमडी प्रेम दिवान यांनी सांगितलं.
नेमकं कोणकोणत्या राज्यात वाढणार बीयरचे दर?रिटेल मार्केटमध्ये बीयरच्या वाढत्या किमतीचा तात्काळ कोणताही परिणाम दिसेल असं वाटत नाही. पण स्वस्त ब्रँडच्या बीयरच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, असं प्रेम दिवान यांनी सांगितलं. अहवालातील माहितीनुसार युनायडेट ब्रुअरिज कंपनी दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि इतर छोट्या प्रदेशांमध्ये बीयरचे दर वाढवणार आहे.
मागणी वाढलीभारतात मद्याचे दर राज्य सरकारांकडून ठरवले जातात. त्यामुळेच दरात वाढ करणं असो किंवा कमी करणं असो याबाबत कंपन्या राज्य सरकारांशी चर्चा करतात. राज्य सरकारांना याच माध्यमातून मोठी कमाई मिळते. मद्याच्या दरातील मोठा वाटा राज्य सरकारच्या कराचा असतो. बीयरच्या किमतीत वाढ होताना दिसत असली तरी गेल्या दोन वर्षांत मागणीत खूप मोठी वाढ झाल्याचंही दिसून आलं आहे. प्रीमिअम बीयरची मागणी तर अधिक वाढली आहे. कंपन्यांच्या दाव्यानुसार याआधीच्या तुलनेत प्रीमिअम बीयरचा व्यवसाय दुपटीनं वाढला आहे. दरात वाढ केल्यानंतरही मागणीत घट झालेली नसल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे.