Join us  

LPG Price Hike : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 8:44 AM

LPG Cylinder Price Hike : ऑक्टोबर २०२४ महिन्याचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून इंधन कंपन्यांनी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.

LPG Price Hike From 1st October: आजपासून नवा महिना सुरू झाला आहे. ऑक्टोबर २०२४ महिन्याचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा झटका बसला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून इंधन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र, यंदाही १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी सिलिंडरची वाढ करण्यात आली असून, तेल कंपन्यांनी १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत कमर्शिअल एलपीजी सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपयांवरून आता १७४० रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.

काय आहेत नवे दर?

IOCL च्या वेबसाईटनुसार, १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत सप्टेंबरमध्ये १६०५ रुपयांवरून १६४४ रुपये करण्यात आली होती, त्यानंतर ती पुन्हा एकदा त्यात वाढ झाली असून ती १६९२.५० रुपये झाली आहे. 

याशिवाय कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत आतापर्यंत १८०२.५० रुपये होती पण आता ती १८५०.५० रुपये झाली आहे. याशिवाय चेन्नईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९०३ रुपये करण्यात आली आहे, जी आतापर्यंत १८५५ रुपये होती.

जुलैनंतर सातत्यानं वाढ

जुलै २०२४ पासून १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे १ जुलै २०२४ रोजी इंधन कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत कपातीची (LPG Price Cut) भेट दिली होती आणि राजधानी दिल्लीत या सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी करण्यात आली होती. पण पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये १९ किलोचा गॅस सिलिंडर ८.५० रुपयांनी महागला. तर १ सप्टेंबर रोजी दिल्लीत त्याची किंमत थेट ३९ रुपयांनी वाढवण्यात आली.

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही

एकीकडे १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्यानं बदल होत असताना दुसरीकडे इंधन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे (LPG Cylinder Price) दर बराच काळ स्थिर ठेवले आहेत. महिला दिनी केंद्र सरकारनं १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. तेव्हापासून यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत एका सिलिंडरची किंमत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईत ८१८.५० रुपये कायम ठेवण्यात आलेली आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरसरकार