Join us

चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:07 IST

US China Tariff Tensions : ट्रम्प टॅरिफ लादल्यानंतर चीनने आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलत अमेरिकेचे नाक दाबले आहे. यामुळे अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत आहेत.

US China Tariff Tensions : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाहीसमोर आपण झुकणार नाही, असा अजेंडा चीन राबवत आहे. ट्रम्प टॅरिफसमोर सर्व देशांना तलवारी म्यान केलेल्या असताना चीनने जशास तसे उत्तर देत अमेरिकेलाच माघार घेण्यास भाग पाडले आहे. सध्या दोन्ही देशांनी ऐकमेकांवर १४५ टक्के इतका टॅरिफ लादला आहे. जगातील २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकल्याने इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवरही गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही देशांचे संबंध ताणले असताना बीजिंगने वॉशिंग्टनविरुद्ध आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलले आहे. या कृतीने चीनने अमेरिकेचे नाक दाबल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

चीनच्या एका निर्णयाने संपूर्ण पाश्चात्य देश चिंतेतअमेरिकेची कोंडी करण्यासाठी चीनने आता चुंबक, दुर्मिळ खनिजे आणि धातूंसह अनेक महत्त्वाच्या आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांना शस्त्रास्त्र निर्मितीसाठी लागणारे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेकर्स, एरोस्पेस उत्पादक, सेमीकंडक्टर कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीन सरकार निर्यातीसाठी एक नवीन नियामक प्रणाली तयार करत आहे. एकीकडे धोरण तयार केले जात असताना, दुसरीकडे, न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, अनेक चिनी बंदरांवर चुंबकांपासून ते कार आणि क्षेपणास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, नवीन नियामक प्रणाली तयार झाल्यानंतर, अमेरिकन लष्करी कंत्राटदारांसह काही कंपन्यांना वस्तूंचा पुरवठा करण्यास कायमची बंदी घातली जाईल.

चिनी वस्तूंवर अमेरिकेचे अवलंबित्वनिर्यातीवर बंदी घालण्याचा बीजिंगचा हा निर्णय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आहे. चीन जगातील सुमारे १७ प्रकारच्या दुर्मिळ खनिजांचे ९० टक्के उत्पादन करतो, ज्याचा वापर संरक्षण ते इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा उद्योगांमध्ये केला जातो.

स्मारियम, गॅडिलेनाइट, टर्बियम, डिस्पोरियम, ल्युटेशियम, स्कॅन्डियम आणि यट्टिलिम यासह ७ प्रकारच्या मध्यम आणि जड दुर्मिळ पृथ्वी खनिजांना निर्यात नियंत्रण यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेकडे फक्त एकाच दुर्मिळ खनिजाचे उत्पादन होते. पण, त्यापैकी बहुतेक ते चीनमधून आयात करतात.

वाचा - एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान

चीनचा डाव अमेरिका कसा उलटवणार?डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, अमेरिकेतील बहुतेक उद्योग हे इतर देशांच्या पुरवठा साखळीवर अवलंबून असल्याचे ट्रम्प यांना विसर पडला असावा. आज उत्पादन क्षेत्रात चीनचा कोणीही हात धरू शकणार नाही. अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर चीनने लगेच भारतीय बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळवला आहे. पण, चीनने अमेरिकेतील निर्यात थांबवल तर अमेरिकन उद्योग अडचणीत येऊ शकतात. याला ट्रम्प कसे तोंड देतात? हे पाहावे लागेल.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पचीनअमेरिकाटॅरिफ युद्ध