Join us

लय भारी... एकाच आयडीवरून मिळणार सरकारच्या योजना आणि सुविधांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:29 AM

ही सेवा सुरू झाल्यानंतर विविध सेवा आणि योजनांशी जोडले जाण्यासाठी एकापेक्षा अधिक लॉगिन आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक प्रकारच्या योजना किंवा सेवेचा लाभ घेण्यासाठी आता एकच डिजिटल प्रोफाईल असणार आहे. येत्या ऑगस्टपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याला ‘सिंगल साईन ऑन’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एकाच आयडीद्वारे सर्व प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच, आता तुम्हाला पुन्हा पुन्हा पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

ही सेवा सुरू झाल्यानंतर विविध सेवा आणि योजनांशी जोडले जाण्यासाठी एकापेक्षा अधिक लॉगिन आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचे / सुविधांचे एकत्रीकरण करण्यासाठी ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्हाला या पोर्टलवर एकदा सही करावी लागेल. त्यानंतर युजरचे प्रमाणिकरण होईल. त्यानंतर या एकाच आयडीद्वारे प्रत्येक प्रकारच्या योजनेचा लाभ आयुष्यभर घेता येईल. पोर्टलवर एकदा साईन इन केले केले की शाळा, महाविद्यालयीन प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्र, वीज-पाणी बिल जमा करणे, रेल्वे - विमान तिकीट, मालमत्ता कर, प्राप्तिकर रिटर्न, जीएसटी रिटर्न भरणे, व्यवसाय परवानगी यासंबंधीच्या सुविधाही मिळणार आहेत. शिष्यवृत्ती अर्ज, व्यवसाय मान्यता, स्टार्टअप नोंदणी सुविधा यावर उपलब्ध असतील.

ठराविक व्यावसायिक सेवांसाठी, त्याच पोर्टल किंवा ॲपद्वारे वार्षिक अपडेटसाठी वर्षातून एकदाच केवळ ओके बटणावर क्लिक करून पुष्टीकरण आवश्यक आहे. बँकिंग सेवांसाठी वापरण्यात येणारी केवायसीही याला जोडली जाईल. सरकार या सुविधेसोबत डिजीलॉकरदेखील एकत्रित करेल, जेणेकरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रतही तेथे उपलब्ध होईल. उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्यवसाय करण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार असून, या सेवेचा सर्वात मोठा फायदा व्यापारी आणि उद्योजकांना होणार आहे.

सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आधीच भरलेला फॉर्म. म्हणजेच, तुम्हाला कोणत्याही सुविधेसाठी अर्ज करायचा असल्यास, फॉर्म उघडताच अर्जदाराशी संबंधित सर्व माहिती वेगवेगळ्या कॉलममध्ये आपोआप भरली जाईल. तुम्हाला फक्त ‘ओके’ बटणावर क्लिक करायचे आहे.

या मिळणार सुविधा : पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, विवाह-जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पीएफ, शस्त्र परवाना, व्यापार परवाना. 

टॅग्स :व्यवसायआधार कार्डपॅन कार्ड