bike taxi driver : वाढत्या महागाईने प्रत्येकजण हैराण आहे. नोकरदारांना महिन्याचा पगार कुठे जातो हे कळतही नाही. मोठ्या शहरात राहायचं म्हणजे किमान ५० हजार ते १ लाख रुपयापर्यंत उत्पन्न असायलाच हवे. आयटी क्षेत्र सोडलं तर अनेकांना ५० हजार रुपये महिनाही कमावता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला सांगितलं की बाईकटॅक्सी चालवून एक व्यक्ती ८० ते ९० हजार रुपये महिन्याला कमावतो, तर विश्वास बसेल का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक बाईक टॅक्स चालक त्याची महिन्याची कमाई सांगताना दिसत आहे. चला या व्हिडीओची सत्यता जाणून घेऊ.
भारतात बाइक टॅक्सीचा वापर झपाट्याने वाढत आहे. लोक कारऐवजी दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बाईक ट्रॅफिकमध्ये अडकत नाही. लोकांना लवकर त्यांच्या स्थानावर घेऊन जाते. बाईक टॅक्सीच्या वाढत्या ट्रेंडमुळे दुचाकी चालकांचे उत्पन्नही वाढत आहे. बाईक चालकांचा कमाईचा आकडा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बाईक टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्ती त्याची महिन्याची कमाई सांगत आहे.
विजय शेखर शर्मा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला. यामध्ये दुचाकी टॅक्सी चालकांच्या कमाईची माहिती देण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये उबेर आणि रॅपिडोसह बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ड्रायव्हरने दावा केला की तो दरमहा ८०,००० ते ८५,००० रुपये कमावतो.
ड्रायव्हरने सांगितले की तो दररोज सुमारे १३ तास काम करतो. यावर आश्चर्य व्यक्त करताना एका युजरने कमेंट केली की, बाईक टॅक्सीचालक महिन्यात जेवढे कमावतो, तेवढे चांगल्या नोकरदारालाही मिळत नाहीत. मात्र, बाईक टॅक्सी चालकाच्या कमाईबाबत या दाव्यावर वापरकर्त्यांची वेगवेगळी मते आहेत. बहुतेकजण म्हणाले की प्रत्येक ड्रायव्हरची कमाई शहरानुसार बदलू शकते. त्याचवेळी, काही वापरकर्त्यांनी या बाइक चालकाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. मेट्रो शहरांमध्ये लाखो बाइक चालक ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या ऑनलाइन कॅब कंपन्यांमध्ये काम करत आहेत.