living financial struggles : वाढत्या महागाईपुढे जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनीही आता गुडघे टकले आहेत. उत्पन्न पुरत नसल्याने पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहे. यातही काही शहरात चरितार्थ चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. यात सायन्स सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूचा पहिला नंबर येतो. या शहराला भारतातील सिलिकॉन सिटी देखील म्हणतात. कारण इथे मोठ्या टेक कंपन्या आहेत. बंगळुरू येथील कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र, लाखो रुपये कमावणाऱ्यांनाही शांत झोप लागत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका तरुणाने बेंगळुरूचा दुसरा चेहरा समोर आणला आहे. तो म्हणतो, त्याचे स्वप्नातील शहर बंगळुरू त्याच्यासाठी ओझे बनले आहे. तो महिन्याला दीड लाख रुपयांहून अधिक कमावतो. तरीही भविष्याची चिंता त्याला सतावत असते. जर आपली नोकरी गेली तर बतच काही महिन्यातच संपेल, अशी परिस्थिती त्याने कथन केली. "माझा पगार अनेकांना आकर्षक वाटत असला तरी कुटुंबाची जबाबदारी आणि कर्जाचे हप्ते यांचा बोजा आहे. या सगळ्यानंतर त्याच्याकडे महिन्याला फक्त ३० ते ४० हजार रुपये इतकेच उरतात. पण, त्याची मुख्य चिंता पैशाची नाही. लहानपणी ज्या शहराची स्वप्न त्याने पाहिली होती. प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती तो अनुभवत आहे.
कुटुंबाचीही जबाबदारी
त्याची चिंता त्याच्या आर्थिक सुरक्षिततेची आहे. आपात्कालीन परिस्थितीत त्याच्याकडे फारच कमी बचत आहे. जर आपली नोकरी गेली तर साठवलेले पैसे तीन ते चार महिन्यांत संपतील, अशी भिती त्याला सतावते आहे. तो आपल्या पत्नीसोबत सध्या पेइंग गेस्ट (PG) मध्ये राहत आहे. कारण बेंगळुरूमध्ये भाड्याने फ्लॅट शोधणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. शहरातील रिअल इस्टेट मार्केट अत्यंत महाग आहे, ज्यामुळे त्याची चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्याचे पालक त्याच्या मासिक योगदानावर पूर्णपणे अवलंबून आहेत. जर त्याने त्यांना पैसे पाठवले नाहीत तर त्यांचे जगणे कठीण होईल. हा भावनिक आणि आर्थिक दबाव त्याच्यासाठी अधिक अडचणी निर्माण करतो.
महागाई हे मोठे कारण
बेंगळुरूमधील महागाई हे देखील त्यांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. तो म्हणतो की शहरात राहण्याचा खर्च इतका जास्त आहे की त्याला मूलभूत गोष्टी खरेदी करण्यातही अडचणी येतात. महागाईमुळे चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ, भाडे आणि सेवा खूप महाग झाल्या आहेत. स्वस्त पर्याय निवडावा तर वस्तूचा दर्जा चांगला नसतो. अशा दुहेरी अडचणीत सध्या तरुण सापडला आहे.