नवी दिल्लीः आतापर्यंत कुटुंबाचा विमा आपण उतरवला असेल, पण आता मित्रांचा विमासुद्धा उतरवता येणार आहे. विमान कंपन्यांनी तुमच्या मैत्रीसाठी फ्रेण्ड्स इन्श्युरन्स आणलं आहे. मैत्रीला सुरक्षेचं कवच देण्यासाठी कंपन्यांनी खास विमा आणला आहे. विमा कंपन्यांकडून मित्रांसाठी नवा आरोग्य विमा देण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात येणार आहे. या विम्याला नाव फ्रेंड्स इन्शुरन्स असं देण्यात आलं आहे.
मित्र परिवार मोठा असल्यास विमान कंपन्या या मित्रपरिवाराची आता काळजी घेणार आहेत. कारण आतापर्यंत कुटुंबीयांचा विमा काढला जात होता, परंतु आता काही निवडक विमा कंपन्यांनी मित्रांचा विमा काढण्याचीही योजना उपलब्ध करून दिली आहे. रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स, मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स आणि कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स या कंपन्यांनी नव्या योजनेचा प्रस्ताव विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. प्राधिकरणानं या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांसोबत मित्रांचाही विमा काढता येणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू होणार आहे.
या विमा उत्पादनात कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 30 मित्रांचा समावेश करता येणार आहे. या मित्राच्या समूहातील कोणीही वर्षभरात क्लेम न केल्यास पुढच्या हप्त्यात 15 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या पॉलिसीचे लाभ सध्या सुरू असलेल्या योजनांप्रमाणेच मिळणार आहेत. विमा उतरवलेल्या समूहातील प्रत्येकाला पॉइंट्स मिळणार आहेत. डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणीवर पॉलिसी नूतनीकरणावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे मित्र परिवारासाठी हा विमा फायदेशीर ठरणार आहे.