Join us

Electricity Bill Online Payment Tips: तुम्हीही ऑनलाइन वीजबिल भरता? ‘या’ गोष्टींची काळजी घ्यावी, अन्यथा बँक खाते रिकामे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 3:25 PM

Electricity Bill Online Payment Tips: ऑनलाइन वीजबिल भरताना काही गोष्टींचे भान ठेवावे, असे सांगितले जाते. नेमकी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...

Electricity Bill Online Payment Tips: सध्याच्या घडीला अनेक प्रकारचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच सायबर क्राइममध्येही वाढ झाल्याचे दिसून येत असून, एका चुकीच्या पावलामुळे बँक खाते रिकामे झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच ऑनलाइन वीज भरताना काही गोष्टींचे पालन न केल्यास तुमचेही बँक खाते रिकामे होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत, जे ऑनलाइन वीजबिलाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार ग्राहकांना बिल जारी झाल्यावर SMS किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे रक्कम आणि पेमेंटची तारीख कळवतात. वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार अशाच प्रकारचे संदेश पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. यासंदर्भात भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

मेसेज किंवा कॉलबाबत सतर्क राहावे

ट्विटरवर अनेकांनी असे मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत बँकेने ग्राहकांना अशा कोणत्याही मेसेज किंवा कॉलबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. मेसेज किंवा फोन कॉलला उत्तर दिल्यास तुमची आर्थिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. वीज मंडळ किंवा पुरवठादार सहसा अधिकृत क्रमांकावरूनच एसएमएस पाठवतात म्हणूनच त्याची नेहमी तपासली पाहिजे. तुमचे वीज बिल थकले आहे. ते अद्यतनित करण्यासाठी दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा, असे न केल्यास तुमचे वीज कनेक्शन खंडित केले जाईल, अशा प्रकारचे दिशाभूल करणारे मेसेज पाठवून एखाद्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करण्यास सांगतात. असे केल्याने तुमची आर्थिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू शकता.

नेमकी काय काळजी घ्यावी?

- अशा परिस्थितीत जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्या मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासा. 

- जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. 

- अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका.

- तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

- या सर्व गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ऑनलाइनबिल