घर आणि ऑफिसमधील सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करणाऱ्या पॅकर्स आणि मुव्हर्स उद्योगातील बनावट कंपन्या ग्राहकांना स्वस्तात सामान पोहोचवण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत. पॅकर्स आणि मूव्हर्स कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या मुव्हर्स फेडरेशन ऑफ इंडियाने (MFI) ग्राहकांना यासंदर्भात एक इशारा दिला आहे. डिजिटल वापरानंतर फसवणुकीत वाढ झाली आहे आणि कंपन्यांवर विश्वास न ठेवता त्यांची तपासणी करणे अडचणीचं ठरू शकतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
एका मोबाईल सिमद्वारे काम सुरू
बनावट कंपन्या ग्राहकांच्या वस्तू घेऊन गायब होत असल्याची दररोज दोन तीन प्रकरणे समोर येत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. "या पाच अब्ज डॉलर्सच्या उद्योगात ४० ते ४५ लाख लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. तर अप्रत्यक्ष स्वरूपात ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. या उद्योगासाठी कोणतेही परवाना धोरण नसून बनावट कंपन्या केवळ मोबाईल सिम घेऊन व्यवसाय सुरू करतात," अशी माहिती एमएफआयचे प्रवक्ते आणि सचिव अनूप मिश्रा यांनी दिली.
रस्त्यातच सामानाची विक्री
बनावट कंपन्या भाड्याने घेतलेल्या मजुरांद्वारे आणि भाड्याने घेतलेल्या वाहनांद्वारे ग्राहकांच्या घरगुती वस्तू पॅक करतात आणि त्या निर्धारित ठिकाणी पोहोचवण्याऐवजी ते रस्त्याच्या मध्यभागी कुठेतरी विकतात. अशा कंपन्यांकडे कोणतेही रेकॉर्ड नसल्यामुळे तक्रारींनंतर त्यांचा शोध घेणे अवघड आहे. एमएफआयच्या म्हणण्यानुसार, नामांकित कंपन्यांसारखीच नावे असलेल्या कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जाते.
अशा प्रकरणांकडे पाहतो आपल्या वेबसाईटवर कंपन्यांची एक यादी तयार केली आहे आणि त्याद्वारे लोकांना सेवा घेता येतील. अनेक टप्प्यांमध्ये छाननी केल्यानंतरच या कंपन्यांना या यादीत स्थान दिलं जातं. त्यांनी केलेल्या कोणत्याही चुकांवर संघटनेद्वारे कठोर कारवाईदेखील केली जाते, असंही एमएफआयनं सांगितलं.