Join us

Bhadreshwar Vidyut: कर्जात बुडालेल्या 'या' कंपनीला खरेदी करण्यासाठी अदानी-अंबानी रेसमध्ये; जिंदल, वेदांताही यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 9:17 PM

कर्जाच्या ओझ्याखाली असलेली ही पॉवर कंपनी खरेदी करण्यासाठी अदानी-अंबानी आमनेसामने आले आहेत.

फ्युचर रिटेलनंतर (Future Retail) आता देशातील दोन दिग्गज अब्जाधीश त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एका कर्जबाजारी कंपनीचा समावेश करण्यासाठी आमनेसामने आले आहेत. आम्ही तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्याबद्दल सांगत आहोत. वास्तविक, भद्रेश्वर विद्युत कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत केवळ अदानी आणि अंबानीच नाही तर अन्य १२ वीज कंपन्याही सामील आहेत, ज्यांनी खरेदीत स्वारस्य दाखवलं आहे.

भद्रेश्वर विद्युत वीज कंपनी मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली सापडली आहे. कंपनीचं कर्ज डिसेंबर २०२० मध्ये नॉन-परफॉर्मिंगच्या आधारावर विभागलं गेलं. यानंतर, एकूण १,७७५ कोटी रुपयांच्या कर्जासाठी ८५० कोटी रुपयांच्या कर्जाचा रिस्ट्रक्चरिंग प्रस्ताव तयार करण्यात आला, जो लेंडर्सनं फेटाळला. यापूर्वी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांनी किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर रिटेलमध्ये स्वारस्य दाखवलं होतं. मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत वाढवत असताना, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकून प्रचंड नुकसान सोसावं लागलेले गौतम अदानी आता पुनरागमन करताना दिसत आहेत.

टोरेंट, वेदांता, जिंदलही रेसमध्ये

ईटीच्या रिपोर्टनुसार भद्रेश्वर विद्युत ही तिसरी वीज कंपनी आहे, जिच्या खरेदीच्या शर्यतीत अदानी समूह आणि रिलायन्स समूह आमनेसामने आले आहेत. यापूर्वी एसकेएस पॉवर आणि लॅन्को अमरकंटक पॉवर लि.च्या खरेदीसाठी दोन्ही मोठे समूह मैदानात उतरले होते. रिलायन्स आणि अदानी ग्रुप व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी भद्रेश्वर खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे त्यात टोरेंट ग्रुप, वेदांत आणि जिंदाल पॉवर यांचा समावेश आहे.

या नावे ओळखली जायची कंपनी

भद्रेश्वर विद्युत वीज कंपनी ज्यासाठी १४ मोठे खेळाडू रिंगणात उतरले आहेत, ती पूर्वी OPGS पॉवर गुजरात म्हणून ओळखली जात होती. दिवाळखोर कंपनीचा गुजरातमधील कच्छमध्ये १५० मेगावॅटचा कोल बेस्ड पॉवर प्लांट आहे. त्यांचे दोन्ही युनिट्स अनुक्रमे २०१५ आणि २०१६ मध्ये पूर्ण झाले. रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार या प्रकल्पासाठी २,०२६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रचंड कर्जामुळे या कंपनीची अवस्था बिकट होत गेली आणि आता या कंपनीची विक्री करण्यात येणार आहे.

टॅग्स :वीजगौतम अदानीमुकेश अंबानी