नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात सध्या जोरदार तेजी दिसून येत आहे. एकेकाळी आयात केलेल्या सुट्ट्या भागांवर अवलंबून असलेला मोबाइल उद्योग आता आत्मनिर्भर झाला आहे. मोबाइल उत्पादनाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून पुढे आला आहे. यासोबत मोबाइल निर्यातीतही भारताचा दबदबा चांगलाच वाढला आहे. मोबाइल फोन हे निर्यात होणारे देशातील सर्वांत मोठे पाचवे उत्पादन ठरले आहे. २०१४-१५ मध्ये देशात उत्पादन केलेल्या एकूण मोबाइलचे मूल्य १८,९०० कोटी इतके होते. आयसीइए ही संघटना ॲपल, शाओमी, ओपो, व्हिवो, लावा आदी कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. या उद्योगाने दहा वर्षांपूर्वी निश्चित केलेले उद्दिष्ट यशस्वीपणे गाठल्याची माहिती इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या (आयसीइए) अहवालात समोर आली आहे.
४.१ लाख कोटी रुपये इतक्या किमतीच्या २.४५ अब्ज मोबाइलची निर्मिती भारतात २०१४ ते २०२४ या १० वर्षांच्या कालखंडात करण्यात आली आहे.
३.२ लाख कोटी रुपये किमतीच्या मोबाइलची निर्यात भारतातून मागील १० वर्षांत करण्यात आल्याचे ‘आयसीइए’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
२५ लाख जणांना मिळणार नोकऱ्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात म्हटले होते की, आगामी काळात भारतातून मोबाइल फोनची निर्यात पाच पटीने वाढून ५० ते ६० अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल.
१० वर्षांपूर्वी ९८ टक्के मोबाइलची आयात करावी लागत असे. आज मात्र स्थिती बदलली आहे. आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील रोजगारही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या क्षेत्रातील रोजगार १० लाखांहून २५ लाखांपर्यंत वाढणार आहेत.
निर्यात वाढणार ७,५०० टक्क्यांनी२०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतातून होणाऱ्या मोबाइलच्या निर्यातीचे मूल्य केवळ १,५५६ कोटी रुपये इतके होते. १० वर्षांत म्हणजेच २०१४ पर्यंत मोबाइलची निर्यात ७५०० टक्क्यांनी वाढून १.२ लाख कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
९७% आत्मनिर्भर अहवालात म्हटले आहे की, १० वर्षांपूर्वी मोबाइल उद्योग आयात मालावर अवलंबून होता. ७८ टक्के भाग आयात केले जात असत. आज ९७ टक्के भागांचे उत्पादन भारतात होते. उद्योगाने १० वर्षांत २० लाख कोटी रुपयांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यातील १९.४५ लाख कोटींचा टप्पा उद्योगाने गाठला आहे.