Join us

सर्वसामान्यांना दिलासा, टोमॅटोनंतर आता सरकार विकणार स्वस्तात डाळ!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 9:09 AM

‘Bharat Dal’ Brand: दिल्ली-एनसीआरमधील नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या  (NAFED) किरकोळ दुकानांमधून चणा डाळ विकली जात आहे.

नवी दिल्ली : महागड्या टोमॅटोपासून सर्वसामान्यांना दिलासा दिल्यानंतर आता सरकारकडून स्वस्त डाळ सुद्धा मिळणार आहे. दरम्यान, केंद्रातील सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी 'भारत डाळ' (Bharat Dal) ब्रँड अंतर्गत चणा डाळ ६० रुपये प्रति किलो दराने विकण्यास सुरुवात केली. दिल्ली-एनसीआरमधील नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या  (NAFED) किरकोळ दुकानांमधून चणा डाळ विकली जात आहे.

एनसीसीएफ (NCCF) केंद्रीय भंडार आणि मदर डेअरीच्या सफलच्या रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. अधिकृत निवेदनानुसार, पीयूष गोयल यांनी 'भारत डाळ' या ब्रँड नावाने एक किलो पॅकसाठी ६० रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू केली आहे. याशिवाय ३० किलोच्या पॅकसाठी अनुदानित चणा डाळ ५५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिली जाईल. सरकारच्या हरभरा साठ्याचे चणा डाळीत रूपांतर करून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने 'भारत डाळ ' सुरू करणे हे केंद्राचे मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एनसीसीएफ, केंद्रीय भंडार आणि सफालच्या किरकोळ दुकाने आणि विक्री केंद्रांद्वारे वितरणासाठी चणा डाळीचे मिलिंग आणि पॅकेजिंग नाफेडद्वारे केले जाते. यामध्ये म्हटले आहे की, या व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी, पोलीस, तुरुंगांतर्गत पुरवठा करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहक सहकारी दुकानांमधून वितरणासाठी चणा डाळ उपलब्ध करून दिली जाते.

निवेदनानुसार, भारतामध्ये चणा डाळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशात अनेक प्रकारात चणा डाळीचे सेवन केले जाते. चन्याचे अनेक पौष्टिक आरोग्य फायदे आहेत. त्यात भरपूर फायबर, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सेलेनियम बीटा कॅरोटीन आणि कोलीन आहे, जे मानवी शरीरासाठी अशक्तपणा, रक्तातील साखर, हाडांचे आरोग्य इत्यादी आणि अगदी मानसिक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

टॅग्स :व्यवसायपीयुष गोयल