एका सरकारी कंपनीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नुकताच १२१ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम डिव्हिडंट म्हणून सरकारला दिली आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्रालयाने सोशल मीडियावरून दिली आहे. याआधी सरकारी बँकांनी वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे हजारो कोटींचा डिव्हिडंट दिला होता.
संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या भारत डायनॅमिक्स लिमिटेडचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनीला सध्या चांगली कमाई होत आहे. या कमाईमधील एक भाग कंपनीने डिव्हिडंट म्हणून सरकारला दिला आहे. आज कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कॉमडोर ए. माधवराव (निवृत्त) यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत २०२२-२३ या वर्षासाठीचा १२१.५३ कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.
भारत डायनॅमिक्स कंपनीच्या होत असलेल्या कमाईची कल्पना कंपनीने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून येऊ शकते. या तिमाहीमध्ये भारत डायनॅमिक्सची निव्वळ नफा हा वार्षिक आधारावर ८९.०४ टक्क्यांनी वाढला होता. शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रामधील कंपनीचं बाजार भांडवल ५४ हजार १५० कोटी रुपये एवढं आहे. मंगळवारीसुद्धा कंपनीचे शेअर वधारलेले दिसले. तसेच भारत डायनॅमिक्सचे शेअर १४७६ रुपयांवर बंद झाले.