काही वर्षांपूर्वी रिलायन्स जिओनं दूरसंचार क्षेत्रात एन्ट्री घेतली आणि नंतर इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले. यानंतर काही कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला, तर काही कंपन्यांना मोठं नुकसानही सोसावं लागलं. परंतु दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलनं मात्र याचा उत्तमरित्या सामना केला. आपण अनेकदा पाहिलं असेल एकीकडे एका कंपनीचे नेटवर्क चांगलं येत असतं तर दुसरीकडे दुसऱ्या. पण गेल्या काही काळात एअरटेलचा एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर सातत्यानं वाढत आहे. जून तिमाहिमध्ये १० वर्षांत पहिल्यांदा एअरटेलचा ARPU २०० रुपयांच्या जादूई आकड्यापर्यंत पोहोचू शकलाय.
व्होडाफोन-जिओ अद्यापही दूर
कोणत्याही टेलिकॉम कंपनीसाठी एआरपीयू महत्त्वाचा असतो. एअरटेलनं गुरुवारी त्यांचे तिमाहिचे निकाल जाहीर केले. एअरटेलचा ARPU एप्रिल-जून तिमाहीत २०० रुपये प्रति महिना होता. त्याच वेळी, मार्च तिमाहीत सर्वाधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओचा एआरपीयू १८०.५ रुपये प्रति महिना होता आणि व्होडाफोन आयडियाचा एआरपीयू १३५ रुपये होता.
३०० रुपयांचं टार्गेट
१० वर्षांपूर्वी आर्थिक वर्ष २०१४ च्या पहिल्या तिमाहित एअरटेलचा एआरपीयू २०० रुपये महिना होता असं बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं नमूद करण्यात आलंय. २०० रुपयांचा एआरपीयू हा ३०० रुपये प्रति महिना या लक्ष्याच्या दिशेनं पहिलं पाऊल असेल, असं कंपनीचे चेअरपर्सन सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं. युझर्सच्या तुलनेत जिओ ही देशातील सर्वात मोठी कंपनी असली तरी एआरपीयूच्या बाबतीत एअरटेल मात्र पुढे आहे.
कसा वाढतोय एआरपीयू?
एंट्री लेव्हल टॅरिफमध्ये सर्वप्रथम वाढ केल्यामुळे भारती एअरटेलचा ARPU वेगानं वाढत आहे. या बाबतीत स्पर्धक कंपन्या खूप मागे आहेत. जानेवारीमध्ये, एअरटेलनं आपला ९९ रुपयांचा किमान रिचार्ज प्लॅन टप्प्याटप्प्यानं बंद करण्यास सुरुवात केली. कंपनीच्या एकूण मोबाइल महसूलापैकी ७.८ टक्के हिस्सा याचा होता. ही स्कीम मार्चच्या मध्यापासून सर्व २२ सर्कल्समध्ये बंद करण्यात आली. त्याच्या जागी १५५ रुपयांचा एन्ट्री लेव्हल प्लॅन आणण्यात आला. नवा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे आणि ही एक दीर्घकालिन विचार केलेली नियोजित चाल होती. बहुतांश युझर्स अनलिमिटेड कॉलिंगला प्राधान्य देतात या आधावर हा प्लॅन आणण्यात आल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
अपेक्षेपेक्षा अधिक 4G ग्राहक जोडले
दुसरी रणनीती म्हणजे सध्याच्या युझर बेसमधून अधिक 4G ग्राहक आणणं हा होता. जे सामान्यत: मोठा प्लॅन घेत नाहीत अशा जुन्या युझर्सनाही 4G वर आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. यात त्यांना यशही मिळत आहे. पहिल्या तिमाहित अपेक्षेपेक्षा अधिक 4G ग्राहक जोडले गेले आहेत. पहिल्या तिमाहित कंपनीसोबत ५६ लाखांपेक्षा अधिक 4G ग्राहक जोडल्याचं एअरटेलनं आपल्या तिमाही निकालात म्हटलंय.